कोयनेत ४१ हजार क्युसेक पाण्याची आवक, साठा ३९.१० टीमएसीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:22 PM2018-07-07T16:22:54+5:302018-07-07T16:27:30+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. कोयनेत तर २४ तासांत ४१ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक झाली.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
कोयनेत तर २४ तासांत ४१ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक झाली. शनिवारी सकाळपर्यंत धरणातील साठा ३९.१० टीएमसीवर पोहोचला होता. तरण गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरूवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.
गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. सोमवारी दुपारपासून पश्चिम भागात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. तर शुक्रवारी काही प्रमाणात पावसाचा जोर मंदावला होता. तर शनिवारपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९६ तर आतापर्यंत १४९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. धोम धरणात २५२६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून साठा ४.१७ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये ४५८० क्युसेकची आवक होऊन साठा ३.१५ तर उरमोडीत ४१२२ क्युसेक पाण्याची आवक होऊन साठा ४.३२ टीएमसीवर गेला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे.
गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत कोयनानगर येथे १४.५ तर आता १४९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. कण्हेरला गतवर्षी २२९ तर आता २३९, उरमोडी गेल्यावर्षी ३१७ तर यावर्षी ३४२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम ४४ (२४८)
कोयना ९६ (१४९०)
बलकवडी ७४( ६७६ )
कण्हेर ०४ (२३९)
उरमोडी ०६ (३१७)
तारळी २० (४६०)
साताऱ्यात पुन्हा हजेरी...
साताऱ्यात सहा दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नव्हते. शुक्रवारी पावसाने थोडीशी उघडीप दिली. पण, शनिवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे साताऱ्यात सतत पाऊस होत आहे.