कोयनेने ओलांडली साठी, ६२.१२ टीएमसी पाणीसाठा; धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:47 PM2018-07-14T13:47:44+5:302018-07-14T13:52:15+5:30
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाने शनिवारी सकाळी साठी ओलांडली. धरणात सध्या ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे.
सातारा/पाटण : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाने शनिवारी सकाळी साठी ओलांडली. धरणात सध्या ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे.
सातारा जिल्ह्यात यंदा जूनमध्ये फारसा पाऊस झाला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसांत मागील दीड महिन्याची कसर भरून काढली. सातारा, पाटण, महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे. साताऱ्यात दोन-तीन दिवस सूर्याचे दर्शनही घडलेले नव्हते.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वरमध्ये चोवीस तासांत सरासरी शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे १०८, नवजा येथे १४६ तर महाबळेश्वरमध्ये ९७ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणात ५३ हजार २०९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
धरणांतील पाणीसाठा
कोयना ६२.१२
धोम : ५.८१
कण्हेर : ५.०९
उरमोडी : ५.५६
नीरा-देवघर : ४.९२
वीर : ३.९९
तारळी : २.९६
भाटघर : १.०३
धोम-बलकवडी : ०.३७
महू : ०.०८७
हातगेघर : ०.०८९
नागेवाडी : ०.०७९
मोरणा-गुरेघर : ०.९९७
उत्तरमांड : ०.३७५
वांग : ०.७०३
गेल्यावर्षीपेक्षा २२ टीएमसीने जास्त
कोयना धरणात शनिवारी सकाळी ६२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. गेल्यावर्षी याच दिवशी केवळ ३९.४५ टीएमसी पाणी होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा २२.६६ टीएमसीने जास्त वाढला आहे.