तलवारीने केक कापणे भोवले! गुन्हा दाखल : रस्त्यावर वाढदिवस; विद्रूपीकरणाचाही आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:02 AM2017-12-28T01:02:31+5:302017-12-28T01:03:09+5:30
कºहाड : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड शहरात निर्माण झाले असताना ग्रामीण भागातही त्याचे लोण पोहोचले आहे. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड येथेही मंगळवारी रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करून तलवारीने केक कापण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
अखिल अशोकराव मोहिते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रुक येथील अखिल अशोकराव मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त गावात
मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मंगळवारी रात्री गावातील विकास सेवा सोसायटीच्या चौकात स्पीकर लावून वाढदिवस साजरा करण्याचे सुरू होते.अखिलच्या हातात ३० ते ३५ इंच लांबीची तलवार होती. हा प्रकार पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना समजला. उपअधीक्षक ढवळे यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना खात्री करून कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी तत्काळ रेठरे बुद्रुक येथे पोलिस कर्मचाºयांना पाठवले.
पोलिस कर्मचारी गावात पोहोचले त्यावेळी मुख्य चौकात मोठ्या आवाजात स्पीकर
लावून अखिल मोहिते हा हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी अखिल मोहिते याच्याविरोधात कारवाई करत बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, स्पीकर लावून सार्वजनिक शांततेचा भंग करणे, चौकात वाढदिवसाचे फलक लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कॉलेजच्या वीस युवकांवर कारवाई महाविद्यालय परिसरात रस्त्यावर दुचाकी उभ्या करून त्यावर केक कापण्याचा प्रकार युवकांकडून केला जातो. काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी बर्थ डे बॉयसह वीसजणांवर कारवाई केली होती. त्यानंतर रेठरे बुद्रुकमध्ये कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.