भाऊ बुडाल्याच्या धक्क्याने वाचलेल्या बहिणीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:17 AM2017-10-17T00:17:20+5:302017-10-17T00:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद : पुरात बुडालेल्या भावाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मानसिक धक्क्याने बहिणीचाही मृत्यू झाला. मयत पुष्पा शिवाजी जाधव (वय ४५)यांनाही पुरातून वाचविण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, वाई अन् खंडाळा तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणंद परिसरात पूर परिस्थिती ओढावली. खेमवती नदीला अचानक आलेल्या पुरातून जात असताना पुष्पा शिवाजी जाधव (४५) व प्रशांत शिवाजी जाधव (२८) तसेच अतुल भंडलकर हे वाहून जाऊ लागले. यावेळी उपस्थित तरुणांनी साखळी करून व दोरीच्या साह्णाने पुष्पा जाधव व प्रशांत जाधव या मायलेकरांना वाचविले; परंतु अतुल भंडलकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.
अतुल भंडलकर यांच्यावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पुष्पा जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यांना श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ लागला. दम लागत असल्याने त्यांना नातेवाइकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णवाहिकेतून पुण्याला नेत असताना वाल्हे हद्दीत त्यांचा मृत्यू झाला. तेथूनच मृतदेह लोणंदला आणण्यात आला.
एका दिवसात बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.