कास धरण उंचीमुळे पाचपट पाणी
By admin | Published: February 25, 2015 09:10 PM2015-02-25T21:10:18+5:302015-02-26T00:20:50+5:30
उदयनराजे : साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन
सातारा : ‘कास धरणाची उंची वाढविल्यानंतर शहराला पाचपट पाणी उपलब्ध होईल. तसेच कण्हेर योजनेमुळे शहर परिसरातील १८ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. राज्यात शासन कोणाचेही असले तरी लोकहिताची कामे मार्गी लागतील,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.कास येथील साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपाध्यक्षा दिनाज शेख, अतिरिक्त मुख्याधिकारी अशोक लोकरे यावेळी उपस्थित होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘निधी उपलब्धतेच्या दिरंगाईमुळे सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प मार्गी लागण्यास उशीर झाला. याची जाणीव आहे. मात्र, प्राधिकरणाने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. गुळगुळीत रस्ते खोदलेले पाहताना मनाला बरं वाटत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामांपूर्वी पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली पाहिजेत.’‘पाट बंदिस्तीकरणामुळे शहराला जादा पाणी उपलब्ध झाले आहे. प्राधिकरण व पालिका अधिकाऱ्यांनी या पाण्याच्या वितरणाचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल. यासाठी प्रयत्नशील राहावे,’ अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी पालिका पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जादा वीस लाख लिटर पाणी मिळणार
चार कोटी ८५ लाख रुपये खर्चून साडेसहा किलोमीटरचा पाट बंदिस्त करण्यात आला आहे. या कामामुळे रोज वाया जाणारे सुमारे वीस लाख लिटर पाणी सातारकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी दिली.