पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे हस्तगत
By admin | Published: September 15, 2015 12:42 AM2015-09-15T00:42:56+5:302015-09-15T00:44:59+5:30
परप्रांतीयास अटक : कऱ्हाडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची सैदापुरात कारवाई
कऱ्हाड : सैदापूर येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय युवकाकडून पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी दुपारी ही कारवाई केली. उमेश शिवाप्पा शिंदे (वय २९, मूळ रा. चडचण, ता. इंडी, जि. विजापूर, सध्या रा. सैदापूर) असे आरोपीचे नाव आहे.
सैदापूर येथील उमेश शिंदे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह गुन्हे शाखा उमेश शिंदे याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. उमेश शिंदे हा एका व्हॅनवर चालक म्हणून काम करतो. दररोज तो ती व्हॅन घेऊन शहरातून फिरत असतो. गुन्हे शाखा त्याच्या दैनंदिन हालचालींची माहिती घेत होती. अखेर त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह सहायक फौजदार ए. पी. पवार, हवालदार पी. के. कदम, नाईक पी. बी. पवार, देवानंद खाडे, कुलदीप कोळी, राजू कोळी, अमोल पवार, राजू पाटोळे, वैभव डांगरे यांनी सैदापूर येथे उमेश शिंदे याच्या घरावर छापा टाकला. उमेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूलविषयी चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी घरासमोर उभ्या असलेल्या व्हॅनची (एमएच ०८ - ९५३०) झडती घेतली. त्यावेळी व्हॅनमध्ये पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.
दरम्यान, उमेश शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नसला तरी त्याचा एक नातेवाईक परराज्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. संबंधित पिस्तूल उमेशने त्या नातेवाइकाकडून आणली आहे का? याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. तसेच तो इतर गुन्हेगारी व्यक्तींशी संपर्कात आहे का? याचीही खातरजमा केली जात असल्याचे सहायक निरीक्षक काकंडकी यांनी सांगितले.
सहा वर्षांत ३५ रिव्हॉल्व्हर हस्तगत
कऱ्हाडात रिव्हॉल्व्हर व गावठी कट्ट्याशी संबंधित अनेक गुन्हे यापूर्वी उघडकीस आले आहेत. गत सहा वर्षांमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तब्बल ३५ रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. २००९ मध्ये ११, २०१० मध्ये ५, २०११ मध्ये ३, २०१२ मध्ये २, २०१३ मध्ये ५, २०१४ मध्ये ४, तर २०१५ मध्ये ४ रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली आहेत.
परप्रांतीय ‘कनेक्शन’
कऱ्हाड शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत आजपर्यंत अनेक पिस्तुले हस्तगत केली आहेत. त्यामध्ये काही स्थानिक व परप्रांतीयांनाही अटक झाली आहे. पिस्तूल परराज्यातून येथे पुरविल्या जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांकडे आहे. मात्र, या साखळीच्या मुळापर्यंत अद्यापही पोलीस पोहोचलेले नाहीत.
आणखी एकजण ताब्यात
अटकेत असणाऱ्या उमेश शिंदे याच्याकडे पोलिसांनी पिस्तुलाबाबत कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून राजू गेणू चव्हाण या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव निष्पन्न झाले. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकून राजू चव्हाण याला ताब्यात घेतले असून, हे पिस्तूूल कोणी व कशासाठी आणले, याची महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.