हायटेक जमान्यातही शुभेच्छा पत्रांचे अप्रूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 06:40 PM2017-10-14T18:40:59+5:302017-10-14T18:41:45+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.
सातारा , दि. १४ : सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना अखंडितपणे चालवली आहे.
गेल्या काही वर्षात उत्सव साजरे करण्याच्या संकल्पना बदलू लागल्या आहेत. दिवाळीच्या अधी सुटी घेऊन किल्ला करणं, त्यासाठी प्रशस्त अंगण, एकत्र फराळ तयार करणं, फराळ करायला परस्परांना मदत करणं, या सर्व गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत.
कुंभारवाड्यातून रेडिमेड किल्ला फ्लॅटच्या गॅलरीत ठेवून पालक स्वत: सह मुलांची समजूत काढत आहे. कित्येकदा फटाके वाजवायला जागा नाही म्हणून शेजाऱ्याकडे किंवा मग गावाला जाऊन राहणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर शहरीकरणाच्या विळख्यात अडकलेल्यांना ख्याली खुशाली विचारायला शेजारीही डोकावत नाहीत, त्यामुळे पत्र आणि टपाल फार लांबची गोष्ट आहे. अशा स्थितीत सहकारी संस्था, सराफी व्यावसायिकांचे दिवाळी शुभेच्छा पत्र नागरिकांना दिलासा देत आहेत.
दिवाळी सणाची गडबड लक्षात घेऊन ही शुभेच्छा पत्रे चार दिवस आधीच दाखल होत असल्याने दिवाळीची चाहूल देत आहेत. त्यामुळे घरांतील प्रत्येक व्यक्तीच्या नजरेस हे शुभेच्छा पत्र पडत आहे.