ऐतिहासिक प्रतापगडावर अवतरला शिवकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:39 PM2017-11-26T23:39:24+5:302017-11-26T23:44:41+5:30
महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजेरी लावली.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सांगली जिल्ह्याचे आयकर विभागाचे सहायक आयुक्त पुर्णेश गुरुराणी तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भवानी मातेची षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणिक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते भवानी मातेची मनोभावे आरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाºया भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ढोल, तुताºया, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अविनाश शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपुरे, तहसीलदार रमेश शेंडगे, महाबळेश्वरच्या गटविकास अधिकारी दिलीप शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, तुताºया, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाºया घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला.
अश्वारुढ पुतळ्याजवळ पालखीचे शिवरायांच्या आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज’ या ललकारीने अन् शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाºयांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.
छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुºहाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
‘वॉटर एटीएम’चे उद्घाटन
शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती प्रतापगड यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.