इतिहासाला उजाळा देतायत किकलीतील विरगळी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:27 PM2018-09-09T23:27:13+5:302018-09-09T23:27:17+5:30
सातारा : विरगळ हे प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत असणाऱ्या भौतिक साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचे साधन असून, हा इतिहासाचा अस्सल पुरावा आहे. हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी किकली, ता. वाई ग्रामस्थ व पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. गाव व परिसरात सापडलेल्या सुमारे ७५ विरगळींचे भैरवनाथ मंदिर परिसरात जतन करण्यात आले असून, किकली हे भारतातील पहिलं ‘विरगळींचं गाव’ म्हणून नावारुपास येणार आहे.
किकली या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात शिलाहार काळात उभारलेल्या बºयाच वास्तूंचे पुरावे, शिलालेख, विरगळ व मंदिर स्वरुपात आजही उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी या मंदिर, ओढे व गावात इतरत्र पडलेल्या अनेक विरगळी गोळा करण्यात आल्या. या विरगळींचे संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली.
गड-किल्ले सेवा समिती, मराठी देश फाउंडेशन, शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान व किकली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विरगळ संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून गावातील सर्व विरगळी एकत्र करून त्याचे गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात संवर्धन करण्यात आले आहे. गायकसबा बीड या गावी भोगवती नदीत सतरा विरगळी आढळून आल्या आहेत.