वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.
जून महिन्यात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरणीची कामे उरकली. घेवडा, ज्वारी, बाजरी, वाटाणा, सोयाबीन आदी पिके शेतकºयांनी शेतात घेतली आहेत. जुलै महिन्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे विहीर, ओढे-नाले, तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. आॅगस्ट महिना सुरू झाला तररी पाण्याचे स्त्रोत कोरडे ठणठणीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रिमझिम पावसावर पिकांची वाढ चांगली झाली असली तरी सध्या मोठ्या पावसाची गरज आहे.
अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी तलाव, विहिरी कोरड्या असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. येरळवाडी, नेर शिरसवडी, पारगाव, येळीव पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वेकडील भागात पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस समाधानकारक झाला आहे. उरमोडी, कण्हेर, धोम, तारळी धरणातील पाणी पाततळीत वाढ झाली आहे.
कृष्णा नदीच्या पात्रात पाणी वाढले होते. हे पाणी वाहून कर्र्नाटकच्या आलमट्टी धरणात जात आहे. शासनाने वाया जाणारे पाणी अडवून दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.
बटाट्याचे क्षेत्र घटले
खटाव तालुक्यातील प्रामुख्याने औंध, पुसेगाव, पुसेसावळी या पश्चिम पट्ट्यात बटाट्याचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु, पुरेसा पाऊस न झाल्याने आणि विहिरीत पाणी नसल्याने शेतकºयांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरविल्याने यंदा बटाट्याचे क्षेत्र घटले आहे.
|