खटाव तालुक्यात महापूर... मायणी तलाव मात्र ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:51 PM2017-10-17T14:51:59+5:302017-10-17T14:58:19+5:30
खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.
मायणी , दि. १७ : खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात तसेच खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागांत दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील येरळा, येळीवसह इतर लहान-मोठ्या तलावक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या भागातील सर्व पाझर तलाव, नालाबांध, मातीबांध, जलसंधारणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
मायणी परिसरात अद्याप पाऊस न झाल्याने कलेढोण, विखळे, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व पाचवड या गावांमधील पाझर तलाव, विहिरी, नालाबांध, तसेच पाणी फाउंडेशन व जलसंधारणातून झालेल्या बंधाºयांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. यामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट जाणून लागले आहे. येत्या काही दिवसांत जर पाऊस झाला नाही, तर या भागातील नागरिकांना जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
बळीराजाचे आभाळाकडे लक्ष
पाऊस नसल्याचे मायणी व कानकात्रे येथील दोन्ही ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे आहेत. हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते. याच तलावांवर येथील खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.