किसन वीर समाज, देशासाठी जगले
By Admin | Published: December 27, 2015 10:59 PM2015-12-27T22:59:38+5:302015-12-28T00:51:56+5:30
संभाजीराव पाटणे : भुर्इंज कारखाना कार्यस्थळावर स्मृतिदिन कार्यक्रम
भुर्इंज : ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज आणि देशभक्तीने प्रेरित होऊन थोर स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ते समाज, देशासाठी जगले म्हणूनच ते महापुरुष ठरले. त्यामुळे त्यांच्यासारखी माणसं ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे यांनी केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. पाटणे म्हणाले, ‘क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करताना किसन वीरांनी आंदोलने, सत्याग्रहे, जेल फोडणे अशा धाडसी कृत्यातून इंग्रजांना हा देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी किसन
वीरांनी दिलेले योगदान देश
कधीही विसरू शकणार नाही. या वाटचालीत यशवंतराव चव्हाण यांची मोलाची साथ लाभली, पुढे या दोघांमध्ये निर्माण झालेली मैत्री
आणि ऋणानुबंध जिल्ह्यासह राज्याने अनुभवली. त्यांच्यासारखी माणसे ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे नमूद करून प्रा. पाटणे यांनी यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या मैत्रीचा आणि स्वातंत्रपूर्व काळातील त्यांच्या कामगिरीचा गौरवाने उल्लेख केला.
प्रा. वसंतराव जगताप, संचालक भगवानराव आवडे यांनीही किसन वीर यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला प्रा. संभाजीराव पाटणे यांच्यासह मान्यवरांनी आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. उपाध्यक्ष गजानन बाबरयांनी स्वागत केले. संचालक नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. गजानन बाबर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, मधुकर नलवडे,
विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके, प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, प्रा. वसंतराव जगताप, शंकरराव पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)