सातारा : कृष्णामाईने टाकली कात; वाई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, भिंती देतायत स्वच्छतेची साद, कृष्णा नदीचे रुपडे पालटले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:09 PM2018-01-20T17:09:23+5:302018-01-20T17:18:06+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.
वाई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाने राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये स्वच्छ सुंदर शहर या स्पर्धेस प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत नगरपालिकांनी सुध्दा मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे़. वाई पालिका प्रशासनाने सर्व पातळ्यांवर कामांचा धडाका लावला असून स्वच्छतेमुळे वाई शहराचे रूपडे पालटताना दिसत आहे़.
वाई शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ ऐतिहासिक, सांकृतिक महत्व असणारी कृष्णा नदी ही वाईची आस्मीता म्हणून ओळखली जाते. सहाजिकच नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़ या जाणीवेतून वाई येथील कृष्णा सेवाकार्य समिती, नगरपालिका, व्यवसायिक, नोकरदार व पर्यावरण प्रेमींनी आठवड्यातील एक दिवस कृष्णेसाठी हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून हाती घेतला असून याचे फलीत म्हणून संपूर्ण घाट स्वच्छ सुंदर होऊ लागला आहे.
या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढत असून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होताना दिसत आहे़ शहरातील भिंतीनाही आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, या भिंतीही आता स्वच्छते बाबत प्रबोधन करू लागल्या आहेत.
कृष्णा नदीचे रुपडे पालटले...
कृष्णामाई सेवा कार्य समितीच्या पुढाकाराने आठवड्यातील प्रत्येक रविवारी वाईकरांच्या सहकार्याने घाटावर स्वच्छता अभियान राबविले जाते. गेल्या तीन महिन्यात कृष्णा नदीची मोठ्या प्रमाणात स्वच्छता झाल्याने नदीचे रूपडे पालटले असून स्वच्छ सुंदर कृष्णामाई कायम रहावी, अशी आपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.