‘कुमार महाराष्ट्र केसरी’ रास्करला मारहाण
By admin | Published: September 2, 2014 11:51 PM2014-09-02T23:51:26+5:302014-09-02T23:51:26+5:30
१३ जणांवर गुन्हा : यशवंतनगरच्या कुस्ती मैदानात खुल्या गटातून न खेळण्यासाठी दमदाटी
कऱ्हाड : यशवंतनगर येथील कुस्ती मैदानात सहभागी होण्यासाठी आलेल्या ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ वैभव रास्करसह त्याच्या मित्राला काल, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. खुल्या गटातून कुस्ती खेळायची नाही, अशी दमदाटी करीत हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांत १३ जणांवर गुन्हा दाखल झाला. नयन निकम (रा. इंदोली, ता. कऱ्हाड), पवन शिंदे (रा. अंतवडी, ता. कऱ्हाड), तन्वीर पटेल (रा. वाघेरी), राजू पोळ (रा. शामगाव), संभाजी कळसे (रा. कासारशिरंबे), संभाजी पाटील (रा. हेळगाव), विनोद शिंदे (रा. अंतवडी), इंद्रजित पवार (रा. वडोली निळेश्वर), स्वप्निल घोडके यांच्यासह अन्य पाचजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंतनगर येथे आज, मंगळवारी दुपारी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्तीत सहभागी होण्यासाठी कडेगाव येथील पै. वैभव रास्कर हा त्याचा मित्र सूरज संजय मदने याच्यासह काल रात्री दुचाकीवरून यशवंतनगरला निघाला होता. ते दोघेजण कोपर्डे हवेलीनजीकच्या विराज ढाब्यासमोर आले असताना रस्त्यावर थांबलेल्या काहीजणांनी त्यांची दुचाकी अडवली. ‘तुम्ही खुल्या गटात कुस्ती खेळायची नाही. जर खेळला तरी तो गट आमच्यासाठी सोडायचा,’ असे म्हणून त्या युवकांनी वैभव रास्करला दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच दुचाकीवरून खाली खेचून त्यांनी त्याला व त्याचा मित्र सूरज मदने याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांना रस्त्यावर खाली पाडून युवकांनी त्या दोघांच्या पायावर गंभीर मारहाण केली. त्यानंतर ते युवक तेथून पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वैभव रास्कर याच्यासह त्याच्या मित्राला उपचारासाठी सिटी मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत कऱ्हाड तालुका पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
कुस्ती मैदान स्थगित
यशवंतनगरला गतवर्षी आयोजित कुस्ती मैदानात पै. वैभव रास्करने मानाचा किताब पटकावला होता. यावर्षीही त्याने किताब मिळवू नये, यासाठी ही मारहाण करण्यात आली असावी, असा संशय आहे. या प्रकारानंतर यशवंतनगर येथे आज, मंगळवारी होणारे कुस्ती मैदान स्थगित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.