आंबा बागायतदार चिंताग्रस्त
By admin | Published: October 26, 2014 09:47 PM2014-10-26T21:47:54+5:302014-10-26T23:24:49+5:30
पावसामुळे धोका : हंगाम लांबण्याची शक्यता
रत्नागिरी : आॅक्टोबर हीट बरोबर आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. गेले दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश झाडांना पालवी आली असून शेतकरी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.यावर्षी दिवाळीत आॅक्टोबर हीट मोठ्या प्रमाणावर होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यत उन्हाचे चटके असह्य होत होते. परंतु अमावस्येनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. परतीचा पाऊस सायंकाळी हजेरी लावत असे परंतु गेले दोन दिवस रात्री तसेच दिवसाही कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पावसामुळे कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.थंडीचा पत्ता नसल्यामुळे आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर प्रक्रिया सुरू होते. पालवीचे प्रमाण अधिक असून पालवीवर तुडतुडा, चिकट्या रोगाचा (बुरशीसदृश्य) प्रादूर्भाव दिसून येत आहे. काही बागायदारांनी पालवीवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली आहे. परंतु पाऊस सुरू झाल्याने औषध फवारणीचा खर्च वाया गेला आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी अजून अवधी आहे. पालवी जून होण्यास साधारणत: एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी आंबा पिक लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय एकाचवेळी रत्नागिरी व देवगड हापूस बाजारात दाखल झाल्यास दर गडगडण्याची भिती आहे.
हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात अधूनमधून बरसणारा पाऊस हे आंबा हंगामासाठी मोठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असून त्यामुळे पाऊस कधी जाणार? याच्या प्रतिक्षेत बागायतदार असल्याचे दिसून येते. लांबलेला पाऊस हे आंबा हंगाम लांबणीवर जाण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे बागायतदारांनी सांगितले. (प्रतिनिधी)
झाडांना आली पालवी
बहुतांश हापूसच्या झाडांना पालवी.
शेतकरी अद्यापही थंडीच्या प्रतिक्षेत.
हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता.
अवचित बरसणारा पाऊस ही आंबा हंगामासाठी धोक्याची घंटा?