साताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 03:29 PM2017-11-10T15:29:13+5:302017-11-10T15:42:49+5:30

या गावातील प्रत्येक कुटूंबात जन्माला येणाऱ्या मुलाची इच्छा आणि आकांक्षा असते की तो भारतीय सैन्यात जावा.

many javans are in indian army from apshinge Military village from satara | साताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र

साताऱ्यातल्या या गावात जन्माला येतात देशाचे वीरपूत्र

googlenewsNext
ठळक मुद्देअपशिंगे गावाच्या नावात ब्रिटीशकालीन इतिहास लपला आहे.जवळपास सर्वच युध्दांत या गावातले जवान सामिल होते.अपशिंगे मिलीटरी गावाला आर्मी स्कुल नसली तरी ते पुण्याच्या स्कुलमध्ये जातात.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणारं एक गाव म्हणजे आपशिंगे मिलिटरी गाव. सातारा जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या या गावात आजही प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे. साताऱ्यात तसं पाहायला गेलं तर अनेक मिलिटरी शाळा आहेत. सैनिकांचा वाढता ओघ बघता इथल्या मिलिटरी स्कूलची व्याप्ती वाढत गेली आणि हे गाव जगाच्या नकाशावर झळकू लागलं.

प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. पर्यटन, ऐतिहासिक वास्तू अशा अनेक कारणांनी गावं प्रसिद्ध असतात. मात्र साताऱ्यातील आपशिंगे हे गाव मात्र अश्या वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावात ८५० कुटूंब आहेत. इथली लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. तर त्यापैकी ५०० हून अधिक लोकं सैन्यात आहेत. 

या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं नाव पडण्यामागे एक इतिहास आहे. पहिल्या महायुद्धात या गावातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांनीच या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं ठेवलं, असं सांगण्यात येतं. पहिल्या महायुद्धात या गावातील जवळपास ४६ जवान शहिद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक युद्ध झाली. त्या प्रत्येक युद्धात या गावातील सैनिक होताच. १९६२ साली चीनविरुद्ध झालेल्या युद्धात या गावातील ४ जवान शहीद झाले. तर, १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात या गावातील २ जवांनाना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर पुन्हा १९७१ साली पाकिस्तानसोबत युद्ध झालं, त्यावेळी एका जवानाने आपले प्राण अर्पण केले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावातील ४ जवान सामिल झाले होते. असा रंजक इतिहास या गावाला आहे. या गावातील अनेकांची आडनावे निकम आहेत. ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचे सांगितलं जातं. 

या गावातल्या सर्व शहीद जवानांसाठी एक स्मारक बांधण्यात आलंय. या स्मारकावर प्रत्येक जवान शहिदांची नावं आहे. त्याचबरोबर तायबुबी इनाम शेख आणि मालन प्रल्हाद निकम या दोन महिलांचाही समावेश आहे. त्याचं नाव स्मारकावर लिहिण्यामागे एक कारण आहे. या दोघींचेही पती सैन्यात सामिल होते. १९६२ साली चीनविरोधात झालेल्या युद्धात या दोघींनी आपल्या पतींना गमावलं होतं. त्यामुळे या गावात जवानांना जेवढं महत्व दिलं जातं, तेवढंच त्यांच्या पत्नीला आणि एकूणच त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला महत्व दिलं जातं. म्हणूनच या वीरपत्नींची नावे या स्मारकावर कोरण्यात आलीयेत.

तसं पाहायला गेलं तर आपशिंगे गावात एकही मिलिटरी स्कूल नाहीये. त्यासाठी त्यांना सातारा किंवा पुण्यात जावं लागतं. पण इकडच्या तरुणांना लहानपणापासूनच आर्मीचे डोस मिळतात ते इकडच्या निवृत्त झालेल्या जवानांकडून. या गावात अनेक निवृत्त जवान आहेत. त्यामुळे गावाला एक वेगळीच शिस्त आहे. गावातील तरुणही  त्यांची शिस्त पाळतात. सैनिकात जायचं म्हणजे अंगी शिस्त असणं फार महत्त्वाचं असतं. निवृत्त जवानांकडून सैन्याचे बाळकडून मिळाल्यानंतर ते सैनिक शाळेत भरती होतात आणि सीमेवर लढण्यास सज्ज होतात. 

या गावातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे हिंदुराव रामराव पाटील. १९६२ च्या चीनच्या युद्धात चीनच्या सैनिकांनी यांना पकडून नेलं होतं. जवळपास २ वर्ष ते चीनमध्ये बंदिस्त होते. युद्धादरम्यान ते हरवले असल्याची तार त्यांच्या कुटूंबाकडे आली त्यावेळी साहजिकच त्यांच्या पत्नीसोबत संपूर्ण कुटूंबाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हिंदुराव यांच्या वडिलांनाही चीन सैनिकांनी बंदिस्त करून ठेवलं होतं, जे पुन्हा केव्हाच भारतात परतले नाहीत. हीच भिती हिंदुरावांच्या मनात होती. चीन आपल्याला मारुन टाकेल, असं त्यांना वाटायचं. पण १९६३ साली एक यादी बाहेर आली. या यादीमध्ये नाव असलेल्यांना भारतात परत सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. सुदैवाने या यादीत हिंदुराव यांचं नाव होतं. १९६४ साली चीनच्या सरकारने त्यांना सोडलं आणि एका मोठ्या प्रवासानंतर ते अपशिंगे गावात परतले. 

या गावात रमेश निकम यांचं कुटूंब राहतं. या कुटूंबातील आतापर्यंत १६ जवान सैन्यात आहेत. म्हणजेच या गावात अशीही काही कुटूंब आहेत जी संपूर्ण कुटुंबच्या कुटूंब सैन्यात सामिल आहेत. असं हे सैनिकांचं गाव जगाच्या नकाशावर अगदी लहान दिसत असलं तरी या गावाचं कार्य फार महान आहे. या गावातील स्वप्निलसारख्या अनेक तरुणांमुळेच संपूर्ण देश शांततेत झोपू शकतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

साताऱ्यातील कंमांडो ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये सैन्य भरतीचं प्रशिक्षण घेणारा स्वप्नील येवले म्हणतो की, ‘देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य असतं. तेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी सीमेवर जाणार आहे. सध्या प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर माझी पोस्टींग जिथे होईल तिथे मनापासून देशासाठी लढायचं एव्हढाच विचार मी केलाय.’

Web Title: many javans are in indian army from apshinge Military village from satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.