राजधानीत उसळला मराठ्यांचा जनसागर, आरक्षणासाठी साताऱ्यात भव्य रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:54 AM2018-07-25T11:54:01+5:302018-07-25T12:01:03+5:30
मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
सातारा : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मराठा आरक्षणासाठी अन् काकासाहेब शिंदे यांच्या हौतात्म्याला न्याय देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव बुधवारी सकाळी राजवाड्याजवळ जमले. आबालवृद्ध अन् तरुण-तरुणी यांच्यासह सर्वच स्तरातील अन् वयोगटातील मंडळी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या होत्या. भगवे ध्वज मोर्चात दिमाखात झळकत होते.
मोर्चाच्या अग्रस्थानी काळ्या पोशाखातील महिलांची दुचाकी रॅली लक्ष वेधून घेत होती. हजारो दुचाकींवरून कार्यकर्त्यांची रॅली राजवाड्यावरून राजपथमार्गे पोवई नाक्याकडे सरकली. या ठिकाणी ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असूनही शिस्तबद्ध कार्यकर्त्यांमुळे रॅली व्यवस्थितपणे पुढे सरकली.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या घोषणा अधिकच तीव्र होत गेल्या. कोण म्हणतंय देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय, म्हणत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असाही निर्धार अनेकांनी केला.
दरम्यान, सातारा जिल्हा बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज एसटी, खासगी वाहने, शाळा-महाविद्यालये, पेट्रोलपंप अन् यासह संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली आहे.