मातीतल्या कवितांच्या गंधाने मोहरला ग्रंथमहोत्सव
By admin | Published: January 5, 2016 12:43 AM2016-01-05T00:43:57+5:302016-01-05T00:43:57+5:30
उत्कृष्ट सादरीकरण : वास्तव स्थितीवर आधारित शब्द श्रृंखलांनी रसिकांची मने जिंकली
सातारा : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ व्या सातारा ग्रंथमहोत्सवात निमंत्रित कवींबरोबरच नवोदित कवींनी मातीतल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. वास्तव स्थितीवर आधारित कवितांच्या शब्द श्रृंखलांनी उपस्थित सातारकर रसिकांची मने जिंकली.
या कवी संमेलनात उद्धव कानडे, धनंजय तडवळकर या निमंत्रित कवींसोबतच ज. तू. गार्डे, दिव्या जगदाळे, गणेश बोडस, ध्रुव पटवर्धन, प्रकाश फरांदे, माधुरी धायगुडे, शोभा जगदाळे, अॅड. संगीता केंजळे, किशोर धरपडे, कुणाल हेरकळ, प्रल्हाद पारटे, सुवर्णा म्हस्कर, प्रा. नंदकुमार शेडगे, अभिषेक जाधव, आयमन शेख, प्रा. बानुबी बागवान, सचिन पटवर्धन या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
‘जय जवान...जय किसान’ चा नाराच जणू या कवी संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथमहोत्सवात घुमला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना परखड भाषेत सुनावले. ‘सरकारे बदलली तरी मानसिकता बदललेली नाही,’ असे भाष्य करून त्यांनी सोनियाचा दिनू नाही की शरदाचं चांदणं पडलं नाही. केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र यांच्या येण्यानेही लोकांच्या जगण्यात फरक पडलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धेवर टीका करताना त्यांनी ‘देवाच्या दगडाला स्पर्श बाईचा चालेना,’ अशा शब्दात परखड भाष्य केलं.
शहीद जवानाच्या मुलीच्या मनातील भावना व्यक्त करताना अतीत येथील विद्यालयाची दिव्या जगदाळे हिने ‘मनात काहूर उठते बाबा...तुमची आठवण येताना!’ अशा शब्दांत आपली कविता मांडली. या कवितेने उपस्थितांची मने हेलावली. शिरगावच्या कवयित्री सुवर्णा म्हस्कर यांनी शेतकऱ्यांचे दु:ख मांडलं. काबाडकष्ट करूनही शेतकरी उपाशीच राहतो. त्यांनी सोनियाचा दिवस कधी पाहायला मिळणार?, असे प्रश्नचिन्ह या कवयित्रीने उपस्थित केले.
उद्धव कानडे यांनी देव-देवतांच्या नावाखाली चाललेली फसवेगिरी शब्दांत मांडली. ‘खेड्यातला काय अन् शहरातला काय, सगळ्यांनाच देवाकडं जायाचं हाय; पण कुणालाच कळंना देव कुठं हाय. देव वाऱ्यात हाय, देव पाण्यात हाय; पण देवाला कुणी जाणलंच नाय. साखर बी नाय अन् बकरा बी नाय, देवाजी निवद कधी खात नाय.’ अशा काव्यपंक्तीने त्यांनी प्रबोधनपर भाष्य केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी प्रदीप कांबळे यांनी केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तीन कोटींच्या पुस्तकांची विक्रमी विक्री
सातारा : सातारा ग्रंथमहोत्सवाला यंदा १७ वर्षे पूर्ण झाली. या सातत्यपूर्ण साहित्य चळवळीमुळे वाचनसंस्कृतीला बळ मिळाले आहे. यंदाच्या गं्रथोत्सवात तीन कोटींची उलाढाल झाल्याची माहिती ग्रंथ महोत्सवातील स्टॉलच्या संयोजिका सुनीताराजे पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गं्रथमहोत्सवाला ३१ डिसेंबरला सुरुवात झाली. पुढच्या तीन दिवसांत ग्रंथ विक्रीच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी साहित्यपे्रमींची झुंबड उडाली. यंदाच्या ग्रंथमहोत्सवामध्ये ११२ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रंथांचे स्टॉल्स बहुसंंख्येने होते. ई-लर्निंग, कॉम्प्युटरच्या स्टॉल्सनेही या ठिकाणी हजेरी लावली होती. ग्रंथमहोत्सवाला १७ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या ग्रंथमहोत्सवात ग्रंथांच्या विक्रीचा आलेख वाढतच चालला असून, यंदा ग्रंथांची विक्रमी विक्री झाली. रहस्य कथा, व्यक्तिविशेष, पौराणिक कादंबऱ्या, पाक कलेची पुस्तके, मुलांना आवडणाऱ्या गोष्टी या पुस्तकांसोबतच आता करिअरची नवी संधी शोधून देणारी सामान्य ज्ञानाची पुस्तकेही या ग्रंथ महोत्सवात उपलब्ध झाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पर्वणी ठरली.
महाविद्यालयाची पदवी घेत असलेले विद्यार्थीही १९५० च्या दशकातल्या कादंबऱ्यांवर तितकेच लक्ष ठेवून आहेत. सलग १७ वर्षे सातत्याने चाललेला महोत्सव महाराष्ट्रात इतर कुठेही पाहायला मिळत नसल्याने साताऱ्याच्या या साहित्य प्रयोगामुळे दर्जेदार साहित्य लोकांपर्यंत पोहोचते. (प्रतिनिधी)
कादंबरीची मोहिनी
४विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर लालबाग’ व खा. शरद पवारांच्या जीवनावर आधारित ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकांना वाचकांची मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’, रणजित देसाई यांची ‘स्वामी’, विश्वास पाटील यांची ‘पानिपत’, ‘झाडाझडती’, ‘महानायक’, ‘पांगिरा’, वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ या कादंबरींची मोहिनी सातारच्या तरुणाईवर कायम असल्याचे यंदाही स्पष्ट झाले.