भोसरे येथे तलवार हल्ल्यात एक जखमी
By admin | Published: March 22, 2015 12:16 AM2015-03-22T00:16:17+5:302015-03-22T00:16:17+5:30
गावात तणाव : ‘बघून का हसलास’ म्हणून भांडण
औंध : ‘माझ्याकडे बघून का हसलास,’ असा जाब विचारत भोसरे, ता. खटाव येथील युवकावर पैलवानाने तलवार हल्ला केला. यामध्ये संतोष हणमंत जाधव (वय ३५) हा जखमी झाला. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
औंध पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हणमंत जाधव हा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्र माधव जाधव व कैलास गुजर यांना घेऊन दुचाकीवरून चौकीचा आंबा येथून भोसरे बसस्थानकाजवळ आला. त्यावेळी गावातीलच पैलवान शिवाजी हरिदास जाधव याने गाडी संतोषच्या दुचाकीला आडवी मारली. ‘तू माझ्याकडे बघून का हसलास,’ असे म्हणत संतोषवर शिवाजीने तलवार हल्ला केला. यामध्ये संतोषच्या हाताला जबर मार लागला.
तलवार हल्ल्यामुळे भोसरे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीत संतोषच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजी हरिदास जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद शिवाजी जाधव यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)
मित्र पळून गेले !
संतोषला अचानक सुरू झालेली मारहाण पाहून त्याचे दोन मित्र तेथून घाबरून पळून गेले. संतोष जखमी अवस्थेत असल्याचे समजल्यानंतर चुलते शिवाजी नामदेव जाधव व ग्रामस्थांनी त्याला तातडीने वडूज येथे व त्यानंतर सातारा येथे हलविले. मात्र, गंभीर जखमी असल्याने अधिक उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.