प्रकाश आमटे यांना पी. डी. पाटील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
By admin | Published: July 1, 2015 11:08 PM2015-07-01T23:08:38+5:302015-07-02T00:25:24+5:30
कऱ्हाड : बाळासाहेब पाटील यांची माहिती
कऱ्हाड : सन २०१५ सालचा ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा मॅगेसेस अॅवॉर्ड विजेते व दिवंगत बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. कऱ्हाड येथे बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पी.डी. पाटील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, शिक्षण मंडळ कऱ्हाडचे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, ‘पी. डी. पाटील यांच्या कार्याच्या गौरवार्थ ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने २०११ पासून घेतलेला आहे. ज्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर नेली. अशा व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार हा मॅगेसेस अॅवॉर्ड विजेते आणि दिवंगत बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा आॅक्टोबर महिन्यात होणार असून, ५१ हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.यापूर्वी २०११ मध्ये पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, २०१२ मध्ये कोल्हापूर येथील अपंग समाजसेविका नसिमा हुरजूक, २०१३ मध्ये पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, २०१४ मध्ये मुंबई येथील पद्मभूषण पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. जेष्ठराज जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी दिली. (प्रतिनिधी)