फलटण शहरात घुमलं पिवळं वादळ
By admin | Published: April 28, 2017 12:53 AM2017-04-28T00:53:52+5:302017-04-28T00:53:52+5:30
फलटण शहरात घुमलं पिवळं वादळ
धनगर समाजाचा क्रांती मोर्चा : अहिल्याकन्यांच्या हस्ते निवेदन; संघटनांचा पाठिंबा
फलटण : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, त्यांना अनुसूचित जमातीचे दाखले द्यावे, आदी मागण्यांसाठी मल्हार क्रांती मोर्चा तर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला, मुली यांचीही संख्या मोठी होती. मोर्चामुळे शहर पिवळेमय झाले होते. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचा एल्गार करण्यात आला.
आपल्या हक्कासाठी सकल धनगर समाज गुरुवारी हजारोंच्या संख्येने एकवटला होता. यावेळी ‘मल्हार क्रांती’ मोर्चामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एसटी दाखला मागणीचा अर्ज हजारो जणांनी भरून दिला. हे सर्व अर्ज नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांच्याकडे अहिल्या कन्यांनी निवेदनासह दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखल द्यावा, या मागणीचे अर्ज दाखल करण्याच्या अभिनव आंदोलनासाठी ‘मल्हार क्रांती’ मोर्चाच्या झेंड्याखाली एकवटलेल्या सकल धनगर समाजाने आरक्षण मागणीसाठी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते तहसीलदार कार्यालय, असा मोर्चा काढला. ‘मल्हार क्रांती’च्या या दुसऱ्या एल्गारात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यासह, बारामती, माळशिरस तालुक्यांतून समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यासाठी समाजाने पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच बारामती येथे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे व ‘रासप’चे महादेव जानकर आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत १५ दिवसांच्या आत धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर संपूर्ण राज्यातील धनगर समाज प्रभावित झाला होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही झाला. मात्र, सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. सरकारने आश्वासन पाळण्याची मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. मोर्चास्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली होती. मोर्चाचा मार्ग पिवळ्या झेंड्यांनी माखून गेला होता. धनगर समाजाच्या मागण्यांचा व दिलेल्या आश्वासनाची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी धनगर समाज ‘मल्हार क्रांती’च्या झेंड्याखाली एकवटला होता. जिल्ह्यातील हा दुसरा मल्हार मोर्चा शिस्तबद्धरीत्या पार पडला. यावेळी प्रियदर्शनी कोकरे, प्रियंका आटोले या मुलींची भाषणे झाली. मोर्चाला मराठा क्रांती मोर्चा आणि विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
अर्ज दाखल करण्याचे
अभिनव आंदोलन..
अत्यंत साधेपणा, शिस्त व सरळमार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात एसटी आरक्षण दाखला मागणी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन राबविले होते. याला प्रचंड प्रमाणात समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रतिसाद दिला. कोणताही पक्ष व संघटना न पाहता सकल धनगर समाजबांधव एकवटले होते.
युवक, युवतींसह महिलाही सहभागी
‘मल्हार क्रांती’चे समन्वयक गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून भूमिका मांडत होते. त्यास समाजबांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. मोर्चात युवक, युवती व महिलांनी सहभाग नोंदविला. या मल्हार क्रांती मोर्चास यावेळी विविध संघटनांनी पाठिंबा नोंदविला. मोर्चाची सांगता अहिल्या कन्यांनी आपल्या मागण्या कशा योग्य आहेत, हे पटवून दिले व समाजाला एकसंध राहण्याचे आवाहन केले.