पोवई नाक्यावर ब्रेक निकामी होऊनही दुचाकीस्वार बचावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:35 PM2017-10-21T14:35:47+5:302017-10-21T14:48:37+5:30
तीव्र उतारावर दुचाकीचा ब्रेक निकामी होऊनही दुचाकीवर असलेले दोन युवक बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास येथील पोवई नाक्यावर घडली.
सातारा ,दि. 21 : तीव्र उतारावर दुचाकीचा ब्रेक निकामी होऊनही दुचाकीवर असलेले दोन युवक बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास येथील पोवई नाक्यावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णानगर येथील संजय मगर (वय २३) आणि सोनू (वय १८) हे दोघे दुचाकीवरून कृष्णानगरकडे निघाले होते. यावेळी पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कलजवळ त्यांच्या दुचाकीचा पाठीमागचा ब्रेक अचानक निकामी झाला. पुढचा ब्रेक त्यांच्या दुचाकीचा पूर्णपणे बंद अवस्थेतच होता.
तीव्र उतार असल्यामुळे त्यांच्या दुचाकीने वेग घेतला. सोनू नावाचा युवक दुचाकी चालवत होता. त्याने त्याच स्थितीत दुचाकी सिव्हिलच्या रस्त्याकडे वळविली. त्यानंतर जोर-जोरात ओरडत त्याने ब्रेक निकामी झाल्याचे नागरिकांना सांगितले. त्यांच्या सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळही कमी होती. त्याच वेगामध्ये त्यांची दुचाकी सिव्हीलच्या रस्त्याने गेल्याने आणखीच त्यांचा जीव धोक्यात आला.
सिव्हिल रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे हा प्रकार पाहाणाऱ्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्या युवकाने घाबरून न जाता हेम एजन्सीजवळील दुभाजकावर दुचाकी धडकविली. दुचाकी वेगात असल्याने दोघेही उडून बाजूला फेकले गेले. मात्र, फारसी त्यांना जखम झाली नाही. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही युवकांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, यासंदर्भात संबंधित युवकांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तासाभरापूर्वी दुचाकीचा ब्रेक दुरूस्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्यावेळेस दुरूस्त करताना ब्रेकची नटबोल्ट लावण्यास चुकून गॅरेजवाला विसरला असेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित युवकांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.