‘शब्दप्रभू’चा प्रसाद दुर्बलांना!
By admin | Published: September 30, 2015 09:25 PM2015-09-30T21:25:29+5:302015-10-01T00:29:12+5:30
छंद शब्दकोड्यांचा : शेकडो परिचितांना मिळवून दिली हजारोंची बक्षिसे
प्रगती जाधव-पाटील -- सातारा --वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शब्दकोड्यांच्या माध्यमातून शेकडो नातेवाईक आणि परिचितांना भरघोस बक्षिसे मिळवून देणारे जगन्नाथ तुकाराम बाबर परिसरात ‘कोडेवाले आजोबा’ म्हणून परिचित आहेत.
ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील जगन्नाथ बाबर हे गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यात राहतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत त्यांनी शब्दकोडे सोडविण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहज कुतूहल म्हणून त्यांनी एका शब्दकोड्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस लागले. यातून हुरूप मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याच स्पर्धेत भाग घेतला. सगळी उत्तरे बरोबर येऊनही त्यांच्या पदरी निराशा पडली. असे दोन-तीनवेळा झाल्यानंतर त्यांनी थेट संबंधितांना फोन करून याविषयी विचारले. ‘एका व्यक्तीला एकदाच बक्षीस देतो आम्ही,’ हे उत्तर त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईक आणि परिचितांच्या नावाने शब्दकोडे पाठविण्यास सुरुवात केली. एकसारखे अक्षर दिसू नये म्हणून त्यांनी आपल्या नातवंडांचीही कोडे लिहून घेण्यासाठी मदत घेतली. सर्व पै-पाहुण्यांना मिक्सरपासून तेलाच्या पिशवीपर्यंतची सर्व बक्षिसे मिळवून दिल्यानंतर बाबर यांनी शेजाऱ्यांच्या नावानेही शब्दकोडे पाठविण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जांभळे विकायला येणाऱ्या दुर्गम भागातील महिलेलाही त्यांनी मिक्सर मिळवून दिला. ‘टपालाचा खर्च तुम्ही करता बक्षीस राहू दे तुम्हाला’ असे त्यांना सांगिंतले; पण ‘तुमच्या नशिबाचे तुम्हा पाशीच असू दे’ असे म्हणत त्यांनी कोणाच्याही बक्षिसावर स्वत:चे नाव ठेवले नाही. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या समाजसेवेचे अनेकांनी कौतुकही केले आहे. तल्लख बुद्धी, सुरेख अक्षर आणि मांडणीचे कसब असलेल्या बाबर यांच्याकडे शब्दांचा अक्षरश: खजिना आहे.
असे सोडवतात शब्दकोडे...!
जगन्नाथ बाबर एका दिवसाला चार वृत्तपत्रांमध्ये आलेले शब्दकोडे सोडवतात. कोणतेही शब्दकोडे सोडवताना त्यांना त्यात खाडाखोड झालेली आवडत नाही. म्हणून ते शब्दकोड्याची प्रतिकृती एका कागदावर रेखाटतात. ही प्रतिकृती रेखाटण्यासाठी ते नातवंडांनी वापरलेल्या वहीची कागदे किंवा एका बाजूला वापरून दुसरी बाजू कोरा असलेला कागद वापरतात. शब्दकोड्यातील कोणताही शब्द अडला तर बाबर त्यासाठी आपल्या नातेवाइकांसह काही शिक्षकांची मदत घेतात. पूर्ण शब्दकोडे सोडविल्यानंतर ते पक्क्या कागदावर उतरवून काढतात. बाबर यांची नातवंडे आळीपाळीने हे कोडे कागदावर बिनचूक उतरवितात.