कोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:03 PM2018-06-25T16:03:07+5:302018-06-25T16:10:00+5:30
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.
काहीसी ओढ दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत पश्चिम भागात चांगलीच सुरुवात केली आहे. कोयना, तारळी, बलकवडी धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच महाबळेश्वरला पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
कोयनानगर येथे पावसाची हजेरी कायम आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत ४० मिलिमीटर पाऊस झाला होता. तर सोमवारी सकाळपर्यंत ३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे.
तारळी धरण क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस होत आहे. तेथे २४ तासांत २५ मिलिमीटर पाऊस झाला. या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. तर सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कण्हेर धरणात २४ आणि बलकवडीत १४० क्युसेक पाण्याची आवक झाली. तसेच कोयनेतही पाण्याची आवक होऊ लागली आहे.
साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही रिमझिम...
सातारा शहरात रविवारी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभर हा पाऊस सुरू होता. सोमवारीही शहरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम ०१ (५४)
कोयना ३३ (४६१)
बलकवडी १८ (२१६)
कण्हेर ०३ (६२ )
उरमोडी ०७ (६४)
तारळी २५ (१४८ )