एकांकिका स्पर्धेत ‘रंगदर्पण’ची बाजी
By admin | Published: September 26, 2016 10:35 PM2016-09-26T22:35:18+5:302016-09-26T23:15:10+5:30
एक लाखाचे बक्षीस : मदनभाऊ पाटील महाकरंडक स्पर्धेत ‘पाझर’ द्वितीय, तर ‘भक्षक’ला तृतीय क्रमांक
सांगली : सांगली महापालिकेच्यावतीने आयोजित मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मांद्रे (गोवा) येथील ‘रंगदर्पण’च्या ‘क्युरिअस केस आॅफ’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. एक लाख रुपये रोख, मदनभाऊ महाकरंडक व प्रशस्तीपत्र देऊन रंगदर्पण संघाचा गौरव करण्यात आला. औरंगाबादच्या नाट्यवाडा संस्थानिर्मित ‘पाझर’ या एकांकिकेने द्वितीय, तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाच्या ‘भक्षक’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला.
येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी रात्री एकांकिका स्पर्धा पार पडल्या. तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेला सांगलीकर रसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिकेच्यावतीने प्रथमच एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी गोवा, महाराष्ट्रातील २६ संघ पात्र ठरले होते. एक लाख रुपये बक्षीस असलेली बहुधा ही राज्यातील पहिलीच स्पर्धा असल्याने रसिकांनाही मोठी उत्सुकता होती. द्वितीय विजेत्या संघाला ५० हजार रोख व करंडक, तृतीय क्रमांकासाठी २५ हजार व करंडक व उत्तेजनार्थ दोन संघांना दहा हजार व करंडक देण्यात आला. याशिवाय वैयक्तिक गटातही बक्षिसे देण्यात आली.
काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील, सांगली महापालिकेचे महापौर हारुण शिकलगार, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील, स्पर्धेचे कार्याध्यक्ष, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक राजेश नाईक, विष्णू माने, रोहिणी पाटील, शेवंता वाघमारे, पुष्पलता पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल असा - प्रथम- ‘क्युरिअस केस आॅफ’(रंगदर्पण, मांदे्र), द्वितीय- पाझर (नाट्यवाडा, औरंगाबाद), तृतीय- भक्षक (मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), उत्तेजनार्थ - गजरा (बृहन्मुंबई महापालिका), ‘द कॉन्शस’ (आमचे आम्ही, पुणे). वैयक्तिक गट - दिग्दर्शन - प्रथम - अमर कुलकर्णी (क्युरिअस केस आॅफ), द्वितीय - रावबा गजमल (भक्षक), तृतीय- प्रवीण वाटेकर(पाझर), अभिनेता - प्रथम - रावबा गजमल (भक्षक), द्वितीय - अमर कुलकर्णी (क्युरिअस केस आॅफ), तृतीय - सुधीर पाटणकर (पोएटिक जस्टीस), अभिनेत्री - प्रथम - दीप्ती साळुंखे (द कॉन्शस), द्वितीय- सोनाली मगर (सेल्फी), तृतीय - पायल पांडे (पार्सल), उत्कृष्ट बालकलाकार - अभिजित सावंत (पाझर), उत्कृष्ट संहिता - चैतन्य सरदेशपांडे (क्युरिअस केस आॅफ), पार्श्वसंगीत - प्रथम - वैभव वाडवे (पाझर), द्वितीय - संकेत पाटील (एक दोन अडीच),
तृतीय - अक्षय डंके (दो बजनिये), नेपथ्य - प्रथम- प्रतिगांधी (पुणे), द्वितीय - आदित्य ओगले (पार्सल), तृतीय - प्रसाद गोरे (दो बजनिये), प्रकाश योजना - प्रथम - अक्षय जाधव (जून-जुलै), द्वितीय - संजय तोडणकर (पोएटिक जस्टीस), तृतीय - यश नवले (तो पाऊस आणि टाफेटा). (प्रतिनिधी)
स्पर्धेत सातत्य ठेवणार : हारुण शिकलगार
महापालिकेच्यावतीने प्रथम एक लाखाचे बक्षीस असलेली एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला सांगलीकर रसिकांनीही उदंड प्रतिसाद दिला. सांगली ही नाट्यपंढरी असून, महापालिकेच्यावतीने एकांकिका स्पर्धेची चळवळ यापुढेही निरंतर सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी यावेळी दिली. पुढीलवर्षी एकांकिका स्पर्धा महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात होईल, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले.
ढोल-ताशांचा निनाद
पारितोषिक वितरण कार्यक्रमात नादप्रतिष्ठाच्या ढोल-ताशा पथकाने रंगत आणली. पारितोषिक जाहीर होताच विजेत्या संघाकडून नाट्यगृहात जल्लोष केला जात होता. त्याला ढोल-ताशांची जोड मिळत होती. ढोल-ताशांचा निनाद आणि टाळ्यांच्या गजरात कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
संतोष पाटील झाले भावूक
स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी मदनभाऊ पाटील यांच्यानावे एकांकिका स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेचा समारोप करताना पाटील यांनी भाषणात मदनभाऊ पाटील यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे नाट्यगृहात काही काळ शांतता पसरली होती. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचेही डोळे पाणावले होते.
‘लाख मराठा’ ने आता मेहंदीही रंगली!
महाविद्यालयीन युवतींमध्ये क्रेझ : हातावर मराठा महामोर्चाची मेहंदी तर कुठे टॅटूही; नक्षीच्या जागी ‘लाख मराठा’
कऱ्हाड : मेहंदी काढणे हे स्त्रियांना चांगलेच आवडते. मेहंदीतून अनेक कलात्मक नक्षी काढली जाते. कुणी लग्नकार्यात तर कुणी मंगलप्रसंगी मेहंदी काढतात. यासाठी अनेक नक्षीही आहेत. सध्या सातारा मराठा महामोर्चाबाबत सर्वत्र चर्चा चालू असल्याने त्याची जय्यत तयारीही युवक-युवतींतून केली जात आहे. युवकांकडून मराठा महामोर्चाच्या संदेशाचे टी-शर्ट, स्टिकर्स तयार करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये युवतीही पाठीमागे नाहीत. मराठा समाजाबद्दल स्वाभिमान व आपुलकी असलेल्या युवतींकडून आपल्या तळहातावर ‘एक मराठा लाख मराठा,’ अशा संदेशाची मेहंदी काढली जात आहे. त्यामुळे महाविद्यालयातही अनेक युवतींचे तळहात ‘एक मराठा लाख मराठा’ने रंगलेले दिसून येत आहे.
मराठा समाज बांधवांकडून सध्या सातारा येथे काढण्यात येणाऱ्या महामोर्चाची जय्यत तयारी केली जात आहे. महामोर्चाला युवकांप्रमाणे आपणही मोठ्या संख्येने जाणार असल्याचा निर्धार अनेक युवतींनीही केला आहे. विशेष म्हणजे या दिवशी महाविद्यालयीन युवक-युवतींनीही महामोर्चाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. युवतींकडून सध्या आपल्या तळहातावर ‘एक मराठा लाख मराठा’, होय, आम्ही मराठा, राजे शिवछत्रपती, सातारा मराठा महामोर्चा दि. ३ आॅक्टोबर, जय भवानी, जय शिवाजी, उठ मराठा जागा हो महामोर्चाचा धागा हो, अशा प्रकारचे संदेश काढले जात आहेत.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील महिला, युवतींमध्येही सध्या मराठा महामोर्चाविषयी चर्चा केली जात आहे. ग्रामीण भागात महाविद्यालयास एसटीने येताना महामोर्चाविषयी चर्चा होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. युवतींनीही आपल्या तळहातावर ‘एक मराठा लाख मराठा,’ असा संदेश काढत महामोर्चात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला आहे. शहरातील युवतींमध्ये मराठा महामोर्चाबद्दल एवढी उत्सुकता पाहायला मिळत आहे की, काहींनीतर आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर चक्क एक मराठा लाख मराठा, मराठा
क्रांती महामोर्चा असे स्टिकर्स लावले आहेत.
महाविद्यालयीन युवतींमध्ये महामोर्चाविषयी वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. गाडीवर मराठा महामोर्चाचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. मराठा महामोर्चाची प्रसिद्धी पाहता सर्वसामान्य व्यापारी, शासकीय कर्मचारी तसेच डॉक्टरांपासून ते सामान्य शेतकऱ्यांनी महामोर्चाला जाण्यासाठी तयारी केली आहे. महाविद्यालयातही युवक-युवतींच्या ग्रुपमध्ये महामोर्चाबाबत अनेक विषयांवर चर्चा केल्या जात आहेत. महामोर्चाला जाताना हातावर ‘एक मराठा लाख मराठा,’ अशा संदेशाची मेहंदी काढण्याचा युवतींनी निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)