रांगोळी सांगू लागली खड्ड्यांचा खतरा, अनोख्या आंदोलनाचा सातारी पैंतरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:30 PM2017-11-02T12:30:20+5:302017-11-02T12:40:17+5:30
दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती.
सातारा ,दि. ०२ :दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तर काहींनी हा प्रकार मोबाईलमध्येही कैद केला. आता तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करत होते.
रांगोळी दिसली की वाहनचालक वेग कमी करुन वाहने चालवत होते. जणू ही रांगोळीच त्यांना खड्ड्यांचा धोका सांगत होती. वाहतूक पोलिस आणि वाहतूक मित्रांनी हेल्मेट घालण्याबाबत वारंवार सांगूनही हेल्मेट वापरण्याची तरुण-तरुणींची मानसिकता नाही.
साताऱ्यातील प्रमुख रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. मोठ-मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन घसरुन अनेक अपघात झाले आहेत. परंतु या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी पोवई नाका परिसरातील दहा ते पंधरा खड्ड्यांभोवती रांगोळी काढली. तसेच खतरा असे लिहून अनेक ठिकाणी चिन्हही काढले होते.