रत्नागिरी : आंबेनळी अपघातातील त्या मृतांचे साहित्य नातेवाईकांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:05 PM2018-08-18T15:05:10+5:302018-08-18T15:25:50+5:30
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.
दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.
मोबाईल, बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्यादरम्यान वस्तूंची ओळख पटवून त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मृत कर्मचाऱ्यांचे साहित्य, पंचनामे, शवविच्छेदन अहवालाची प्रत नातेवाईकांना देण्यात आली.
तपासिक अंमलदार पवार दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी व नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. काही पालक विद्यापीठात पोहोचू शकली नाहीत. अशा कर्मचाºयांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन वस्तू देण्यात आल्या आहेत. काही मोबाईलच्या माध्यमातून या अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
अपघातस्थळावरून सापडलेल्या काही वस्तू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परंतु, सोन्याचे काही दागिने गायब झाले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या वस्तूंचाही शोध सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला व गाडी कोण चालवत होते. याचे गूढ कायम असून, याबाबत तपास सुरु आहे.
वस्तू पाहताच आठवणी दाटल्या
कर्मचाऱ्यांचे साहित्य घेताना अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने जड अंत:करणाने घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परंतु, या वस्तूमुळे आठवणी ताज्या होऊन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
घड्याळांची टिक टिक थांबली...
घड्याळांची टिक टिक ११ वाजून १७ मिनिटांनी किंवा ११ वाजून १६ मिनिटांनीच बंद पडल्याचे तपासादरम्याने सापडलेल्या घड्याळांवरून दिसत आहे. तपासादरम्याने सापडलेली ही घड्याळे सव्वा अकरानंतर बंद पडल्यामुळे अपघात अंदाजे ११ वाजल्यानंतर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजूनही दु:खाचे सावट कायम
आंबेनळी दुर्घटनेला २१ दिवस उलटून गेले असून, मृत कर्मचाऱ्यांची कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीत. दापोलीवर अजूनही दु:खाचे सावट असून, या धक्क्यातून ना विद्यापीठ सावरले ना दापोलीकर! परंतु, दापोलीकरांप्रमाणेच विद्यापीठानेही मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.