सातारा : लोणंदमध्ये १०० अतिक्रमणे हटविली, बांधकाम विभागाबरोबरच पोलिसांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:14 PM2018-05-31T14:14:11+5:302018-05-31T14:14:11+5:30
लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला.
लोणंद : लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला.
लोणंद शहरातून जाणाऱ्या पुणे-सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठीअतिक्रमणे झाली होती. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून कायम होत होती. तसेच या अतिक्रमणामुळे वाहनांची कोंडी वारंवार होत असे. यामुळे अहिल्यादेवी चौक ते शास्त्री रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १० मीटरपर्यंत अतिक्रमण केलेल्या सुमारे ११० जणांवर कारवाई केली.
दरम्यान, वारंवार तोंडी सांगूनही अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी ही मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान काहीजणांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली तर रस्त्याच्या दोन्ही बाजुची अतिक्रमणे सरसकट काढण्यात आली. तसेच शहरातील खंडाळा-शिरवळ रस्त्यावर देखील व्यापारी व व्यावसायिकांनी मोठी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी होत आहे.
या मोहिमेत लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे व शुभांगी कुटे, हवालदार विशाल वाघमारे, संजिव देशमुख आदी सहभागी झाले होते.