साताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:40 PM2018-07-24T13:40:46+5:302018-07-24T14:00:21+5:30
मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.
सातारा : मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरम्यान, जुना आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी रात्री शिवशाही बसवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञातांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपुरातून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंदमधून सातारा जिल्हा वगळण्यात आला होता. महाराष्ट्रभर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मंगळवारी दुपारी मराठा आमदार, खासदारांसह इतर लोकप्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीकडे पोलीस खात्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्ते अकस्मातपणे वाढे फाट्यावर एकत्र आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.. काकासाहेब शिंदेंच्या हौतात्म्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत उड्डाणपुलाखाली आंदोलन सुरू झाले. याची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली.
दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरून थेट महामार्गाचा रस्ता धरला. एक मराठा.. लाख मराठा अशा टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरूवात करताच हायवेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. काही काळानंतर आंदोलन चालले. यावेळी घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी २३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
बुधवारी सातारा बंदची हाक, मराठा मोर्चाच्या बैठकीत निर्णय
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी तसेच काकासाहेब शिंदे यांच्या हौतात्म्याला न्याय देण्यासाठी बुधवार दि. २५ जुलै रोजी सातारा बंदचा निर्णय समाजबांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी सकाळी नऊ वाजता राजवाडा येथून भव्य रॅली निघणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शेवटी धडकणार आहे.
कल्याण रिसॉर्ट येथे झालेल्या समाजबांधवांच्या बैठकीत बुधवारी बंदची घोषणा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता राजवाडा येथे सर्वसमाज बांधवांनी मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकेल. हा मोर्चा मूक नसल्यामुळे घोषणा दिल्या जातील, मात्र आक्षेपार्ह वक्तव्ये करू नयेत. प्रशासनावर ताण आला पाहिजे. मात्र, कुठलीही तोडफोड होता कामा नये, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
सरकारला मराठा समाजाच्या तीव्र भावना समजाव्यात, यासाठी जिल्ह्यातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने साताऱ्यातील रॅलीत सहभागी व्हावे, असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले.