सातारा : पैलवानाच्या जाण्यानं गहिवरला कृष्णाकाठ, रुग्णालय परिसरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:31 PM2018-04-06T13:31:17+5:302018-04-06T13:31:17+5:30
कऱ्हाड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.
कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणारा कोल्हापूरचा पैलवान नीलेश कंदूरकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं कृष्णाकाठ गहिवरला. रुग्णालय परिसरात शेकडो कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेच्या कुस्ती मैदानात मंगळवारी कुस्ती खेळताना वीस वर्षांचा पैलवान नीलेश कंदूरकरला दुखापत झाली. निपचित पडलेल्या नीलेशला कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
पैलवान नीलेश याच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर पैलवान धनाजी पाटील, पैलवान अमोल साठे, वारणा तालीमचे प्रशिक्षक प्रकाश पाटील यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी कंदूरकर परिवाराला धीर दिला. सकाळी साडेनऊ वाजता शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर तो त्याच्या मूळगावी नेण्यात आला.
आम्ही कुस्तीवर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे एक पैलवान तयार करताना होणारा त्रास आणि एखाद्या पैलवानाच्या आकस्मित जाण्याने त्या परिवारावर कोसळणारा दु:खाचा डोंगर याची आम्हाला जाणिव आहे. त्यामुळे कुरूंदकर परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी आम्ही कऱ्हाडकर कुस्तीप्रेमी जास्तीत जास्त सहकार्य करू.
- पैलवान धनाजी पाटील
आटके, ता. कऱ्हाड