सातारा : मोक्क्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:36 PM2018-03-08T12:36:47+5:302018-03-08T12:38:44+5:30
मोक्का लावण्यात आलेल्या अनिल कस्तुरे टोळीतील फरार आरोपी अक्षय सूर्यकांत जाधव याच्या सातारा पोलिसांनी कास परिसरात मुसक्या आवळल्या.
सातारा : मोक्का लावण्यात आलेल्या अनिल कस्तुरे टोळीतील फरार आरोपी अक्षय सूर्यकांत जाधव याच्या सातारा पोलिसांनी कास परिसरात मुसक्या आवळल्या.
याबाबत माहिती अशी की, खंडणी, दरोडा आणि जबरीचोरी आदी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अनिल कस्तुरे आणि टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.
त्यास त्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मोक्का लावला होता. तेव्हापासून पोलीस कस्तुरे आणि टोळीच्या शोधात होते. त्यातील अक्षय जाधव हा गेल्या काही महिन्यांपासून फरारी होता.
जिल्हा पोलिसांची पथके अनेक ठिकाणी रवाना झाली होती. त्यानंतर बुधवारी तो कास परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्याची माहिती मिळताच परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या पथकाने सापळा रचला.
त्यादरम्यान, दोघेजण दुचाकीवर असल्याचे दिसून आले. त्यांना डॉ. बनसोड यांच्या पथकाने शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सकाळी शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दुपारनंतर त्याला पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.