सातारा : खासदार उदयनराजेंच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:26 PM2018-02-24T15:26:34+5:302018-02-24T15:26:34+5:30
साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सातारा पालिकेची संपूर्ण टीम राबताना पाहायला मिळत आहे.
सातारा : साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सातारा पालिकेची संपूर्ण टीम राबताना पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विजय शिवतारे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडणाऱ्या सोहळ्याची तयारी अजूनही सुरूच आहे.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. समोर लाखभर लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे युवक-युवती या सोहळ्याची तयारी न्याहाळताना दिसत आहेत. सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री व इतर मान्यवर मैदानावर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
पूर्वीच्या नियोजनानुसार मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून थेट कास परिसरात उतरणार होते. तिथे कास धरण उंची वाढविण्याच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. मात्र, या नियोजनात बदल करण्यात आला आहे.
सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पोलीस परेड मैदानाच्या हेलिपॅडवर उतरेल. तिथून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित स्मार्ट पोलीस ठाण्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर पोवई नाका येथे ग्रेड सेपटरेटर व कास उंची वाढविणे व भूमीगत गटार योजना या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. तिथून जिल्हा परिषदेसमोर नियोजित पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून ते सैनिक स्कूलवर आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर खासदार उदयनराजे मित्र समूहाने आयोजित केलेल्या भव्य सोहळा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. शासकीय विश्रामगृहासह, जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ आहे. ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर याठिकाणांहून पोलीस कर्मचारी व अधिकारी साताऱ्यांत दाखल झाले आहेत.
जानकरांनी सकाळीच घेतली भेट
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे शुक्रवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. त्यांनी सकाळी जलमंदिरवर जाऊन उदयनराजेंची भेट घेतली. तिथून पाचगणी येथे आयोजित शाळेच्या एका कार्यक्रमासाठी गेले. तिथून ते पुण्याला निघून गेले.