सातारा : भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत खामकर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:53 PM2018-02-27T13:53:32+5:302018-02-27T13:53:32+5:30
सातारा : सातारा पालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रशांत खामकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपुर्द केला.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालिकेतील मनोमिलन तुटल्यानंतर दोन्ही आघाड्यांनी पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती.
या निवडणुकीत खासदार गटाने पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी भाजपच्या पाच नगरसेवकांनी विजयश्री मिळवून पालिकेत चंचूप्रवेश केला होता.
या निवडणुकीनंतर भाजपच्या वतीने नगरसेवक अॅड. प्रशांत खामकर यांची गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली होती. या पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने खामकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला. खामकर यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याचीच चर्चा आता होऊ लागली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून शहर विकासासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पक्ष्याचा आदेश प्रमाण मानूनच पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही पक्ष्य वाढीसाठी व विकासासाठी जोमाने काम करणार आहे.
- अॅड. प्रशांत खामकर