सातारा : करणीच्या बाहुल्यांपासून वनराईची मुक्तता, ‘अंनिस’ची मोहीम : मांढरदेव गडावरील बाहुल्या, चिठ्ठ्यांचे केले दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:52 PM2017-12-30T17:52:09+5:302017-12-30T18:00:25+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली. हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले.
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली.
हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले. मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात आले. मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.
इथे पशुबळी अथवा लिंबू , बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात. या माध्यमातून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा बेत ‘अंनिस’ने हाणून पाडला.
प्रशांत पोतदार, वीर पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, हौसेराव धुमाळ (सातारा), डोंबलीकर, हरीश दिवार, प्रमोद भिसे, आशिष बनसोडे, संजय सकटे (वाई), नंदिनी जाधव, सुभाष सोळंकी, मोहिते, श्रीराम नलावडे, वल्लभ वैद्य (पुणे) यांनी शनिवारी झालेल्या बाहुल्या हटविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.
या सर्व सर्व बाहुल्या, चिठ्ठ्या, लिंब व बिबे गोळा करुन मोकळ्या जागेत त्यांचे दहन करण्यात आले. या माध्यमातून प्रबोधनाचा जागर करण्यात आला. करणी केली म्हणून कुणाचेही वाईट होत नाही, त्याउलट या प्रकारामुळे वनराईचे नुकसान होत आहे. ही बाब सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी ‘अंनिस’ने स्पष्ट केले.
मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.
सूचना फलक असूनही दुर्लक्षित
देवीच्या संपूर्ण मंदिर परिसरात पशुहत्त्या करण्यास बंदी आहे, झाडावर खिळे, बाहुली, बिबे आदी ठोकण्यास सक्त मनाई आहे, मंदिर व परिसरात अनिष्ठ रुढी परंपरा यास बंदी आहे, उतारे, करणीसारखे प्रकार करण्यास सक्त मनाई आहे, आपली कोणाकडून फसवणूक किंवा लुबाडणूक झाल्यास देवस्थानशी संपर्क साधून तक्रारी नोंदवावी, असा फलक देवस्थानतर्फे मांढरदेव गडावर लावण्यात आला आहे. पण याकडे दुर्लक्ष करून त्याशेजारीच असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकून बाहुल्या लटकवल्या जात आहेत.