सातारा : पावसाचा जोर ओसरला तरी धरणे भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:37 PM2018-08-02T13:37:31+5:302018-08-02T13:40:03+5:30
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असलातरी जवळपास सर्व प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कोयना धरणात ८६.७९ टीएमसी साठा झाला असून, सर्व धरणे ८० टक्क्यांच्या वर भरली आहेत. कोयनेनंतर कण्हेर धरणातून गुरुवारपासून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. पश्चिम भागातील भात लागण आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर ओसरला असला तरी प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग आठ दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला होता. तर बुधवारपासून पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे २१०० क्युसेक पाणी सोडणेही थांबविले आहे.
गुरुवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरणात ८६.७९ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण ८२.४६ टक्के भरले आहे. धोम धरण ८३.७८ टक्के, कण्हेर ८१.९६, बलकवडी ८४.९६, उरमोडी ८५.८५ तर तारळी धरण ८४.९३ टक्के इतके भरले आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०१ (४८३ )
कोयना १११ (३६०७)
बलकवडी १९ (१८३६)
कण्हेर ०० (५७५)
उरमोडी ०६( ८८४)
तारळी ०७ (१६११)