सातारा : सूर्याच्या वाकुल्यांनी सातारकर हैराण, यंदाचा उन्हाळा फारच तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:35 PM2018-03-03T19:35:05+5:302018-03-03T19:35:05+5:30
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे.
सातारा : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे.
फेब्रुवारी संपता संपताच उन्हाची चाहूल लागली होती. गत सप्ताहात दिवसा उकाडा आणि रात्री गारठा, अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सातारकरांनी झाकून ठेवलेले पंखे स्वच्छ करून वापरात आणले आहेत.
शहरात ठिकठिकाणी तहान भागवणारी फळं विक्रीस दाखल झाली आहेत. तर घराघरांमध्ये अडगळीत असलेला माठ पुन्हा कार्यरत झाला आहे. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री, गॉगल, सनकोट आदी वस्तूही कपाटाबाहेर आल्या आहेत.