सातारा : कास तलावाच्या थ्री फेज लाईनची चाचणी यशस्वी, सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:02 PM2018-02-12T17:02:16+5:302018-02-12T17:06:14+5:30
कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली.
सातारा : कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली.
सातारा शहराची सर्वात जुनी पाणीपुरवठा योजना म्हणून कासकडे पाहिले जाते. या तलावातून मुरून वाया जाणारे पाणी पुन्हा पाटात सोडण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर केला जात होता.
पाणी उपसा करण्यासाठी १० हॉर्स पॉवर क्षमतेचे दोन डिझेल इंजिन आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सलग सहा ते सात महिने याचा वापर केला जात होता. या कालावधीत पालिकेला डिझेल व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळून सुमारे सात लाख रुपये खर्च करावे लागत होते.
दरवर्षी होणारा हा खर्च कमी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महावितरण विभागाला थ्री फेज कनेक्शन जोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने महावितरण विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी थ्री पेज लाईन कार्यान्वित केली आहे.
या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालिकेच्या या महात्त्वाकांक्षी निर्णयामुळे डिझेलवर होणारा खर्च निम्म्याहून कमी येणार असून, पालिकेची सुमारे पाच लाखांची बचतही होणार आहे.