सातारा : उदयनराजेंच्या सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारांची दांडी, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:55 PM2018-02-24T17:55:12+5:302018-02-24T17:55:12+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.
विशेष म्हणजे शरद पवार जेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यात गुंतलेले होते. याचवेळी दुसरीकडे उदयनराजे हे भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् शिवसेनेचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडवर थांबले होते.
बारामतीतून निघालेले शरद पवार साताऱ्यात आल्यानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रीती हॉटेलमध्ये दाखल झाले. पावणे तीन वाजता राष्ट्रवादीच्या मोजक्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह पक्षातील इतर स्थानिक नेते उपस्थित होते. शरद पवार उदयनराजेंच्या सोहळ्यास उपस्थित राहणार का, अशी चर्चा दिवसभर राहिल्याने या बैठकीकडे बाहेरील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, ही बैठक सुरू असतानाच उदयनराजे अकस्मातपणे याठिकाणी आले. पवार यांचे स्वागत करून ते पुन्हा निघून गेले. त्यानंतर इतर आमदारांची पवारांशी पुन्हा चर्चा सुरू झाली. यानंतर उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी हेलीपॅडवर प्रतीक्षा करू लागले.
यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् साताऱ्याचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे हे होते. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे स्वागत करून उदयनराजे पुन्हा पवारांच्या बैठकीत आले. राजेंशी चर्चा झाल्यानंतर शरद पवारही बैठकीतून उठले. त्यानंतर त्यांची गाडी कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाल्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा संपली.