सातारा : मुबलक पाणी असतानाही मेढ्याला दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:20 PM2018-02-26T12:20:58+5:302018-02-26T12:20:58+5:30
मुबलक पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला गेल्या दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मेढा : मुबलक पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला गेल्या दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून देखील या शहराला गेल्या २० वर्षांपासून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. तसेच या शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना देखील नाही. मेढ्यासाठी १९९० च्या आसपास एक जॅकवेल पाणी योजना सुरू केली. मात्र २ ते ३ वर्षांतच ही योजना बंद पडली.
त्यानंतर १९९६-९७ साली मेढा व ८ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणी योजना सुरू झाली, ही योजना १९९७ ते २००२ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत चालवली. त्यानंतर २००२ ते २००९ पर्यंत ही योजना जिल्हा परिषदेने चालवली. यावेळी जिल्हा परिषदेने काही काळ ही योजना कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिली. त्या कंत्राटदाराने ही योजना परवडत नाही म्हणून सोडून दिली. यानंतर ही योजना २००९ ते २०१६ पर्यंत स्थानिक समिती मार्फत चालवली व त्यांनीही सोडून दिली.
दरम्यान, गेल्या ७ते ८ वर्षांपासून या योजनेचा बोजवारा उडाला असून अनेकदा वीजबिल थकल्याने, तसेच समितीच्या चुकीच्या कारभारामुळे मेढेकरांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. या समितीच्या काळात सुरूवातीला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. तर यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला.
या योजनेची लाखो रुपयांची बाकी थकीत झाल्याने वीज वितरण कंपनीकडून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. त्यांनतर या समितीने थकीत वीज बाकी सुमारे १३ लाख रुपये जनतेच्या डोक्यावर ठेवून ही योजना सोडून दिली आणि त्याच बरोबर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नवा पायंडा पाडला.