सातारा : वणवा जंगलात; धावपळ गावात, वनसंपदा धोक्यात ; नजीकच्या गावात भीतीचे वातावरण, वन विभागापुढे नवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:09 PM2018-01-13T12:09:47+5:302018-01-13T12:14:02+5:30
रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.
गोडोली (सातारा) : रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.
नेहमीप्रमाणे यंदाही आगी लागण्याच्या घटना सुरू आहेत. आग लागू नये, यासाठी कोणतीही ठोस उपाय नसल्याने आग लागण्याचे कारण शोधून त्या लागू नयेत, यासाठी उपाययोजना राबविण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.
बहुतेकवेळा मानवी चुकामुळे जंगलात आगी लागत असल्याचे स्थानिकांचे आरोप असल्याने अशा आगलाव्यांचा शोध घेत भविष्यात आगी लागू नयेत, यासाठी उपाययोजना वन विभागाने राबविणे महत्त्वाचे आहे. मात्र, नेमके तेवढे सोडून सगळे करायचे, असा पायंडा वन विभागाचा असल्याचे बहुतांशी घटनांतून दिसते.
वनयंत्रणा वृक्ष लागवड आणि अन्य तांत्रिक कामात अडकून असल्याने आगी लावणाऱ्यांचा शोध घेणे कठीण होत असल्याचे वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांने सांगितले.
आगलावे मोकाटच...
वनहद्दीत आग लागेल या कारणाने ज्वालाग्राही वस्तूंचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. पण बहुतांशीवेळा आगीच्या कारणात नैसर्गिकरीत्या आग लागण्यापेक्षा मानवाकडून लागल्याचे दिसून येते; मात्र त्यांचा तपास फारसा गतीने होत नसल्याने ते आगलावे मोकाट राहत असल्याने कोणावरही गुन्हे नोंद होत नाही.