सातारा : वाऱ्याशी स्पर्धा १८ मजुरांचा जीव घेऊन गेली, पोलीस तपासात निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:58 PM2018-04-11T13:58:47+5:302018-04-11T13:58:47+5:30
विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले.
शिरवळ : विजापूरहून भोर खोऱ्यात संसाराचा गाडा ओढण्यासाठी निघालेल्या ३७ मजुरांवर टेम्पोचालकाच्या इच्छितस्थळी पोहोचत पुन्हा लवकर माघारी जाण्याच्या अतिघाईमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला. कारण, हवेशी स्पर्धा करत निघालेल्या या चालकामुळे हकनाक १८ जीव गेले तर अनेकांना अपंगत्व आले.
दरम्यान, टेम्पोमालक महिबूब आतार याचा मुलगा माजीद हा प्रथम वाहन चालवत होता; पण तो सावकाश चालवत असल्याने टेम्पोचा ताबा महिबूबने घेतला आणि वाऱ्याशी स्पर्धा निष्पापांची बळी घेऊन गेली, असं पोलीस तपासात पुढे आले आहे.
कर्नाटक राज्यातील विजापूरजवळील विविध गावांतील सेंट्रिग काम करणाऱ्या ३७ मजुरांना घेऊन मुकादम विठ्ठल राठोड हे पुणे जिल्ह्यातील भोरजवळ असणाऱ्या एका गावात निघाले होते. यासाठी विजापूर येथील महिबूब आतार याच्या मालकीच्या टेम्पोमधून व दोन दुचाकीवरून विठ्ठल राठोड हे स्वत: भोरच्या दिशेने सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येत होते. निघताना टेम्पो महिबूब आतार याचा मुलगा माजीद हा चालवित होता.
महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर कऱ्हाडलगत एका हॉटेलवर जेवण केल्यानंतर माजीद हा सेंट्रिगच्या भरमसाठ साहित्यामुळे टेम्पो सावकाशपणे चालवित होता. माजीद व वडील टेम्पोमालक महिबूब आतार यांच्यामध्ये टेम्पो चालविण्यावरून शाब्दिक चकमक उडाली.
महिबूब आतार याच्या म्हणण्यानुसार माजीद हा सावकाशपणे टेम्पो चालवित असल्यामुळे संबंधित मजुरांना सोडण्यासाठी उशीर होणार होता. कारण दुसऱ्या दिवशीच्या भाड्याला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने टेम्पो वेगात चालविण्यास सांगत होता. मात्र, चालक असलेला माजीद हा सकाळपर्यंत सावधपणे जाऊ असे म्हणत होता.
यावेळी महिबूब आतार व माजीद यांच्यामध्ये टेम्पो चालविण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर माजीदने माघार घेत तो टेम्पोमध्ये झोपण्यासाठी गेला. यावेळी महिबूब आतार हा टेम्पो चालवू लागला.
यावेळी दुचाकीवरून येत असलेले मुकादम विठ्ठल राठोड हे थंडी वाजत असल्याने दुचाकीवरून टेम्पोत आले व एका मजुराला दुचाकीवर बसविले. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार महिबूब आतार हा टेम्पो चालविताना हवेशी स्पर्धा करू लागला होता.
दरम्यान, महामार्गावर वाई तालुक्यातील वेळेजवळ चहा घेतल्यानंतर लवकर पोहोचण्यासाठी महिबूब आतारने वाहन भरधाव वेगात घेतले. आशियाई महामार्गावरील मृत्यूचे दार असलेल्या खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवर टेम्पो आला असता नियंत्रण सुटले. त्यामध्येच निष्पाप १८ जणांना चालकाच्या लवकर पोहोचण्याच्या अतिघाईमुळे जीवाला मुकावे लागले.
गंभीर जखमी झालेल्या १९ जणांपैकी दोघांना अंपगत्व येत मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. त्यामुळे घटनास्थळी वेळपूर्वी पोहोचण्यासाठी टेम्पोचालकाने केलेली हवेशी स्पर्धा निष्पाप जीवांच्या जीवावर बेतली, अशी चर्चा सुरू आहे.