शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:28 PM2018-04-17T14:28:50+5:302018-04-17T15:23:06+5:30
शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला.
सातारा/वाई : शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचपुतेवाडी येथे मंगळवारी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवजयंती मंडळाचे काही कार्यकर्ते सोमवारी दुपारी टेम्पो करून शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेले होते. यामध्ये स्वप्नीलचाही समावेश होता.
गडावर शिवज्योत पेटवून कार्यकर्ते पुन्हा पाचपुतेवाडीकडे निघाले होते. मध्यरात्री सवा बारा वाजण्याच्या सुमारास वासी गावच्या हद्दीत स्वप्नील चव्हाण, अमर पाचपुते (वय २५) व विनायक गोळे (२६) हे तीघे दुचाकीजवळ शिवज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी थांबल होते. याचवेळी नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोेरदार धडक दिली.
या अपघातात स्वप्नील चव्हाण, अमर पाचपुते व विनायक गोळे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून टेम्पोसह पोबारा केला. स्वप्नील हा पिंपरी चिंचवड येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो या ठिकाणी आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने पाचपुतेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.