अजिंक्यतारा किल्ल्यासाठी सरसावले सातारकर
By admin | Published: July 4, 2016 10:38 PM2016-07-04T22:38:09+5:302016-07-05T00:32:06+5:30
सुचविल्या असंख्य सुधारणा : शिवसृष्टी प्रतिष्ठानकडून स्वागत
सातारा : साताऱ्याची अस्मिता असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने पाऊल उचलले आहे. या मोहिमेत सातारकर स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत. यासाठी अनेक सूचना त्यांच्याकडून येत असून, या सूचनांचे किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने स्वागत केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मनात स्वातंत्र्याची महात्त्वाकांक्षा निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हाच शिवशक्तीचा ऐतिहासिक वारसा आपल्या शाहूनगरीला लाभला आहे. सर्व भरत खंडाची राज्यसूत्रे अजिंक्यताराच्या, सातारच्या तक्तावरून २३ मे १६९८ ते १ सप्टेंबर १८४८ पर्यंत चालत होती. हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची साक्ष देत असलेला अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास नव्या पिढीला समाजावा, यासाठी किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने किल्ल्याचे वैभव जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत सातारकरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
‘अजिंक्यतारा व्हावा ऐसा सुंदर...’ या मोहिमेत सातारकर सहभागी होऊ लागले आहेत. अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनात अपेक्षित बदल, त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी ते पुढे येत असून, अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत. या सूचनांचे स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठानने स्वागत केले आहे.
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचा, कल्पनांचा फायदा किल्ल्यांच्या संवर्धन प्रक्रियेत होणार आहे. (प्रतिनिधी)
अजिंक्यातारा किल्ल्याचे जतन करताना जुन्या भिंती न पाडता पुरातत्व विभागाच्या पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. किल्ल्यावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता नसून त्याठिकाणी दगडीच रस्ते करावेत. त्यासाठी ऐतिहासिक वास्तूला धक्का लावण्याची गरज नाही.
- प. ना. पोतदार,
निवृत्त उपअभिरक्षक, पुरातत्व विभाग
अजिंक्यातारा हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. हा इतिहास अंत:करणात उभा राहावा, यासाठी ऐतिहासिक पूर्व वैभवाची स्मृती जिती, जागती, तेवती राहावी, यासाठी अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठान सतत कार्यरत राहणार आहे.
- प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण,
सदस्य, सातारा जिल्हा हेरिटेज समिती