पौरोहित्यमध्येही आता सावित्रीच्या लेकीची एन्ट्री...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:50 PM2018-01-07T23:50:10+5:302018-01-07T23:50:10+5:30
सातारा : देवधर्म, पूजाअर्चा अन् पौरोहित्यमध्ये बहुतांश ठिकाणी पुरुषांचेच वर्चस्व पाहायला मिळते; पण लेक शिकल्यानंतर काय घडू शकते, याचा चमत्कार पाटण तालुक्यात पाहायला मिळतो. सीमा आवारे या कडवे परिसरातील गावांमध्ये कोणतेही शुभकार्य असले तरी धावून जातात. त्या सत्यनारायणपासून सर्व प्रकारची पूजा करतात.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं उघडी करून दिली. सावित्रीच्या लेकी बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. त्यातून आता पौरोहित्यही सुटू शकले नाही.
खटाव तालुक्यातील भूषणगड येथील सीमा फडणवीस यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांचा कडवे बुद्रुक येथील संतोष आवारे यांच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. माहेरी वडील पूजाअर्चा करत असत. सासरच्या घरीही पौराहित्य करण्याची परंपरा होती. कडवे परिसरातील गावांची विभागणी झाली अन् सासºयाच्या वाटणीला कडवे बुद्रुक, कडवे खुर्द, जगदाळवाडी, घाटेवाडी ही गावे आली. परंतु पतीचे फारसे शिक्षण न झाल्याने कहाणी वाचताना त्यांना अडचणी येत. त्यामुळे ते पूजा करण्यासाठी जात नसत; पण सीमा या सासºयांबरोबर जात असत. तेथे गेल्यानंतर केवळ बसून निरीक्षण करून त्या पूजा करण्याची पद्धत पाहायच्या.
सासºयांचे निधन झाल्यानंतर चालत आलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून सीमा आवारे स्वत: पुढे आल्या. परिसरात कोणाच्या घरी शुभकार्य असले तर त्या स्वत: पूजा, मंत्र पठण, आरत्या म्हणतात. लग्न असल्यास भावाला मदतीला बोलावतात. परंपरागत चाकोरी मोडून एक महिला पूजा करते, हे पाहिल्यानंतर सर्वांचेच डोळे विस्फारतात; पण स्वागतही केले जाते, असे त्या अभिमानाने सांगतात.
सीमा आवारे या केवळ पौरोहित्यातच रमलेल्या नसून त्यांनी विज्ञानाचा मार्गही धरला आहे. गावातच राष्ट्रीयकृत बँकेचे टेलिमशीन चालवतात. पॅनकार्ड, आधार कार्ड काढण्याचे आॅनलाईन पद्धतीने काम करतात.