धोमची सुरक्षा रामभरोसे, पथदिवे बंद; फ्यूज बॉक्स सताड उघडे
By admin | Published: July 16, 2017 04:02 PM2017-07-16T16:02:56+5:302017-07-16T16:02:56+5:30
उपाययोजना न केल्यास आंदोलन, भाजयुमोचा इशारा
आॅनलाईन लोकमत
वाई (जि. सातारा), दि. १५ : तालुक्यातील मुख्य सिंचनाचा स्त्रोत म्हणून धोम-बलकवडी व नागेवाडी या धरणांकडे पाहिले जाते. या धरणाच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्त्व असताना पाटबंधारे खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू आहे. तसेच धरणाच्या भिंतीवरील पथदिवे बंद असून, फ्यूज बॉक्स उघडे पडलेले आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने धोम पांटबंधारे विभाग, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धोम धरणासह इतर धरणांच्या पाण्यावर हजारो नागरिकांसह लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या तालुक्यातील सर्वच धरणांच्या सुरक्षेकडे मात्र धोम पाटबंधारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. लाखो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न तालुक्यातील धरणांवर अवलंबून असताना पाटबंधारे खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.
धोम धरणात अनेक वर्षांपासून नौकाविहार सुरू असून, नौकाविहाराचा ठेका घेणाऱ्यांकडे अधिकृत परवाना आहे का? नौकाविहार करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? धोम धरणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, ते कोणाच्या परवानगीने करण्यात आले आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू असते. ह्यआओ-जाओ घर तुम्हाराह्ण अशी काहीशी परिस्थिती याठिकाणी आहे. त्यांना रोखणारे कोणी नाही. याला जबाबदार कोण?
धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीटलाईट बंद अवस्थेत असून, फ्यूजबॉक्स सताड उघडे पडलेले आहेत. या सर्व बाबींकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, युवकचे जिल्हा सरचिटणीस मयूर नळ, राकेश फुले, अली आगा, महेश कोकरे, संतोष भागवत आदींच्या सह्या आहेत.
धोम धरणाच्या सुरक्षेसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटक असो किंवा इतर कोणीही भिंतीवर येण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही. धरण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना वेळेत रोखले जाते. धरणाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
- व्ही. बी. जाधव,
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग वाई