कऱ्हाड येथे घातक शस्त्रे जप्त
By admin | Published: September 7, 2015 10:37 PM2015-09-07T22:37:58+5:302015-09-07T22:37:58+5:30
धोत्रेसह पाच अटकेत : सल्या चेप्यावरील खुनी हल्ल्यातील टोळी
कऱ्हाड : कुख्यात गुंड सल्या चेप्यावरील खुनी हल्ल्यात मुख्य आरोपी असणाऱ्या गुंड भानुदास धोत्रे टोळीकडून पोलिसांनी घातक शस्त्रे जप्त केली. शहरातील दत्त चौकात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून पोलिसांनी सहा लोखंडी कोयते, सुरा व गुप्तीसह एक जीप हस्तगत केली आहे. भानुदास लक्ष्मण धोत्रे (वय ४०), दशरथ हणमंत धोत्रे (३२), सागर रमेश जाधव (२०, तिघेही रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड), अनिल चंद्रकांत पाटणकर (२०, रा. रुक्मिणीनगर, कऱ्हाड), प्रवीण लिंगाप्पा धोत्रे (२२, रा. बुरुडगल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात काहीजण जीपमध्ये शस्त्रे घेऊन वावरत असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना रविवारी रात्री खबऱ्यामार्फत मिळाली. याबाबत त्यांनी कऱ्हाडात गस्त घालणारे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रमेश गर्जे यांना माहिती दिली. तसेच संबंधितांना तातडीने ताब्यात घेण्याची सूचना केली. त्यानुसार उपनिरीक्षक गर्जे यांच्यासह पोलीस पथक तातडीने संशयितांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. हे पथक शहरातील कृष्णा नाक्याकडून उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौक, बसस्थानक मार्गे दत्त चौकात आले. मात्र, त्यांना संशयित जीप आढळून आली नाही. त्यानंतर पथक दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वळसा घालून मुख्य बाजारपेठेतून आझाद चौकाकडे निघाले. त्यावेळी मुख्य बाजारपेठेतून एक जीप (एमएच १२ पीए १६१४) दत्त चौकाकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी जीप अडवली व सर्वांना खाली उतरण्यास सांगून चौकशी सुरू केली. जीपची झडती घेतली असता, सीटखाली लपवून ठेवलेले कोयते, सुरा व गुप्ती आढळून आली. या शस्त्रांबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
पोलीस पथकाने जीपसह सर्व शस्त्रे ताब्यात घेऊन संशयितांना शहर पोलीस ठाण्यात आणले. शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. कऱ्हाड शहर पोलिसांत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
कसून तपास
भानुदास धोत्रे याच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर चौघांकडे पोलीस कसून तपास करीत आहेत. कोयते, सुरा व गुप्ती ही घातक शस्त्रे घेऊन हे सर्वजण कोठे निघाले होते? त्यांचा काही कट होता का, या दृष्टीने सध्या पोलीस तपास सुरू आहे.