महाबळेश्वर परिसरातील खड्ड्याविरोधात चिमुरड्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:07 AM2017-11-03T01:07:43+5:302017-11-03T01:13:34+5:30
महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली.
महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. महाबळेश्वर व परिसरातील खड्ड्यांबाबत शहरात ‘विद्यार्थी चिल्लर मोर्चा’ आंदोलन काढण्यात आले. यावेळी बांधकाम विभागाचे महेंद्र पाटील यांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुक्त करणार असून, याची सुरुवात येत्या दोन दिवसांत होणार असल्याचे सांगितले.
महाबळेश्वरमधील या विद्यार्थ्यांच्या मोर्चाची सुरुवात येथील सुभाष चौकामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण व सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास लहान मुलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. लहान-लहान विद्यर्थी या मोर्चात सहभागी झाले होते. मुख्य बाजारपेठेमार्गे शिवाजी चौकात हा मोर्चा पोहोचला.
तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व तेथेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र्र पाटील यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘महाबळेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण असून घनदाट जंगल, औषधी वनस्पती व कंद, पुराणाचे साक्ष देणारे स्वयंभू शिवमंदिर, पंचगंगा मंदिर, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेला प्रतापगड व देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर आहे. या महाबळेश्वरला लाखो पर्यटक भेट देतात. महाबळेश्वरमधील लोकांचा व्यवसाय व उदरनिर्वाह हा या पर्यटकांवर अवलंबून आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या ठिकाणाला चहुबाजूंनी खड्ड्यांनीच वेढले असल्याचे चित्र आहे. खराब रस्ते, दुर्लक्षित फलक यांमुळे आलेला गलिच्छपणाचे, बदनामीचे गालबोट बांधकाम विभागामुळे लागत असून, शासनाचा आलेला निधी निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार व अधिकारी आपल्या घशात घालून स्वत:चे कमिशन मिळविण्यात मश्गुल आहेत. या गलिच्छ जनतेला मरण यातना भोगायला लावत आहेत.’
महाबळेश्वर-पाचगणी प्रवास करताना येणाºया अडचणी प्राणिक नायडू, श्रिजा यादव व साळुंखे यांनी महेंद्र पाटील यांना सांगितल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी बांधकाम खात्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थिती करून स्थानिकांसह पर्यटकांना होणाºया त्रासाचा पाढाच वाचला.
महेंद्र पाटील यांनी या दोन दिवसांत आम्ही खड्डे भरण्यास प्रारंभ करत असून, ३१ डिसेंबरपर्यंत शहर व तालुक्यातील सर्वच रस्ते हे खड्डेमुक्त होतील व महाबळेश्वर परिसरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चामध्ये शिवसेनेचे राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष किसन शिंदे, गोपाळ वागदरे, विजय नायडू, सुरज गाडे, गिरीश नायडू, सलीम बागवान, हेमंतभाऊ शिंदे, इरफान शेख, जावेद वलगे, अनिल केळगणे, आशिष नायडू, नाना कदम, पंकज येवले, सुनील वाडकर, गोविंद कदम, अभिजित जाधव, राजू गुजर, चंदू डोईफोडे, तेजस पाटील आदी उपस्थित होते.
रुग्णांचे हाल
महाबळेश्वरमध्ये रुग्णालयाची सोय नाही, रुग्णास वाई, सातारा, पुणे आदी ठिकाणी हॉस्पिटलसाठी ताबडतोब न्यायचे झाल्यास खराब रस्त्यांमुळे हॉस्पिटलला नेण्याआधीच रुग्ण दगावतो. या गोष्टींना जबाबदार कोण? तुमच्या मुलाबाळांवर किंवा कुटुंबातील व्यक्तींवर असा प्रसंग आला तर काय करायचे? लहान बालक शाळेसाठी रोज सकाळी महाबळेश्वर-पाचगणी व पाचगणी-महाबळेश्वर असा प्रवास करतो. तुम्हाला खाऊसाठी दिलेली चिल्लर कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.