उदयनराजेंचा आज 51वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या या 'दहा रंजक' गोष्टी
By सचिन जवळकोटे | Published: February 24, 2018 12:49 PM2018-02-24T12:49:25+5:302018-02-24T12:56:17+5:30
राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा जगावेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन !
सातारा - सध्या जाहीर कार्यक्रमांममधून एकमेकांवर प्रचंड टीका करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अन् भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआज शनिवारी एकाच व्यासपीठावर एकत्र येताहेत. ही किमया साधलीय साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी.
राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा वेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन !
1) उदयनराजे स्मार्टफोन वापरतात, मात्र 'व्हॉट्स अॅप' बिलकुल नाही. 'मी व्हॉट्स अॅप नाय तर व्हॉटस डाऊन बघतो,' असं मोठ्या अभिमानानं सांगणारे उदयनराजे 'डाऊन टू अर्थ' राजकारण करण्यावर अधिक भर देतात.
2) 'मला महाराज म्हणू नका. महाराज फक्त छत्रपती शिवाजीराजे ,' असं कळवळून सांगणाऱ्या उदयनराजेंना साताऱ्यातील तरुणाई 'लाडकं मालक' म्हणून मोठ्या कौतुकानं संबोधते.
3) 'जिप्सी अन् बुलेट' ही उदयनराजेंची खास आवडती वाहनं. रस्त्यावर एखाद्या कार्यकर्त्याची बुलेट दिसली तर स्वतःच्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या गाडीतून उतरून 'बुलेट सवारी' करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
4) आपल्या कोणत्याही वाहनाचा नंबर 007 हाच असावा, यावर त्यांचा अधिक भर असतो. तीच क्रेझ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही असल्यानं जेव्हा 007 क्रमांकाच्या असंख्य गाड्या शहरातील रस्त्यांवरून फिरू लागतात, तेव्हा सातारकर ओळखतात की उदयनराजे आलेत.
5) शेतकऱ्याची बैलजोडी हा उदयनराजेंचा जिव्हाळ्याचा अन् आवडता विषय. एखाद्या शेतात बैलं दिसली तर गाडीतून उतरून थेट शिवारात जाऊन त्यांच्यावर माया करायला खूप आवडतं.
6) साताऱ्यातील त्यांचे अनेक चाहते नवी गाडी घेतली की थेट 'जलमंदिर' गाठतात. शिव वंशजांच्या या राजवाडा परिसरात राजेंनी स्वतः गाडी चालविली तरच कार्यकर्त्यांचं समाधान होतं. या हट्टापायी कधी-कधी एखाद्या शेतकऱ्याचा नवा कोरा ट्रॅक्टर चालवण्याचीही हौस त्यांना पूर्ण करावी लागते.
7) 'छत्रपती शिवरायांचे वंशज' म्हणून जुन्या काळातील पिढीला राजेंबद्दल भलतंच अप्रूप. कधी तरी भेट झाल्यानंतर राजेंच्या गालावरून हात फिरवून अन् बोटं मोडून त्यांची नजर काढणारी जुनी पिढी आजही साताऱ्यात पाहायला मिळते.
8) रस्त्यावरून चालत जाणारी शाळकरी मुलं दिसली तर ते स्वतःच्या महागड्या गाडीत या सर्व मुलांना बसवतात..नंतर त्यांना त्यांच्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत पोहोचवितात.
9) 'तलवार अन् पिस्तूल' ही त्यांची आवडती शस्त्रं. 'जेम्स बॉन्ड'च्या स्टाइलमध्ये पिस्तूल रोखलेलं त्यांचं छायाचित्र मध्यंतरी भलतंच व्हायरल झालं होतं.
10) आवडत्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन त्याच्या 'गालाचा मुका' घेणं अन् त्याला 'लव्ह यू' म्हणणं, ही त्यांची खासियत. कॉलर उडविण्याची त्यांची अदाकारी तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना घायाळ करून टाकणारी.