टोल नाक्याला पालकमंत्र्यांची हरकत!
By admin | Published: September 19, 2016 11:09 PM2016-09-19T23:09:45+5:302016-09-20T00:07:59+5:30
महाबळेश्वरला मोठा संघर्षाचा धोका टळला
महाबळेश्वर : महाबळेश्वरकरांच्या विरोधाला न जुमानता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वन विभागाने १९ सप्टेंबर रोजी टोलनाका सुरू करण्याची तयारी पूर्ण केली होती. टोलनाका सुरू करण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्थगिती दिली आहे. या टोल नाक्यामुळे वेण्णा लेक येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पालकमंत्री यांच्या या निर्णयामुळे नागरिक व वन विभाग यांच्यातील संघर्ष तुर्त टळला आहे.
पालिका व वन विभागाच्या टोल एकत्रिकरणा संदर्भात जिल्हाधिकारी यांनी एककल्ली भूमिका घेऊन वन विभागाला झुकते माप दिल्याने टोल एकत्रिकरणाचा प्रश्न पेटला आहे. पालिका व वन विभाग यांच्यामधील या वादात आता शहरातील विविध संघटना व पक्षांनी उडी घेतली तर वन विभागाच्या बाजूने क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली या तीन गावांनीही भाग घेण्यास सुरुवात केल्याने महाबळेश्वर येथील वातावरण गरम होण्यास प्रारंभ झाला होता. वन विभागाच्या एकत्रित टोल वसुलीला महाबळेश्वरकरांनी एकमुखी विरोध केला. दरम्यान, महाबळेश्वरकरांच्या विरोधाला न जुमानता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वन विभागाने दि. १९ सप्टेंबर रोजी वेण्णा लेक येथे एकत्रित टोल वसुलीसाठी टोलनाका सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली होती. टोल नाक्याला पालिका व महाबळेश्वरकरांचा विरोध होणार हे गृहीत धरून वन विभागाने मोठा पोलिस बंदोबस्त मागविला होता. तसेच महाबळेश्वरकरांना विरोध करण्यासाठी ग्रामीण भागातील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकांना गोळा करण्याची तयारी केली होती. अशा स्थितीत वेण्णा लेक येथे मोठा संघर्ष होण्याची शक्यात होती.
पालकमंत्री विजयबापु शिवतारे यांनी तातडीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपवन संरक्षक अंजनकर यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला व सविस्तर चर्चा केली चर्चे अंती पालकमंत्री ना विजयबापु शिवतारे यांनी वन विभागाच्या टोलला आठवडयाची स्थगिती दिली तसेच या बाबत सातारा येथे पालकमंत्री ना विजयबापु शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपवनसंरक्षक अंजनकर प्रांताधिकारी अस्मिता मोरे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर तहसिलदार रमेश शेंडगे नगराध्यक्ष उज्वला तोष्णीवाल वनक्षेत्रपाल सुर्यकांत कुलकर्णी सर्व नगरसेवक संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी या बैठकीत पालक मंत्री दोन्ही पक्षाची बाजु ऐकुन घेतली व सर्वांच्या समन्वयातुन एक निर्णय घेण्यात येईल व त्या नंतरच एकत्रित टोल वसुली नाका सुरू करण्यात यावा असे निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)
पर्यटन स्थळाच्या दृष्टीने घातक असल्याने शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी यांची प्रथम बैठक घेतली यात उपस्थित पदाधिकारी यांनी वन विभागाच्या एकत्रिकरणाच्या माध्यमातुन टोल नाक्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ तयार केले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे तालुका प्रमुख यशवंत घाडगे नगरसेवक संतोष शिंदे, लक्ष्मण कोंढाळकर, अतुल सलागरे, शंकर ढेबे, गोपाळ लालबेग, संजय ओंबळे यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांची सासवड येथे भेट घेतली त्यावेळी पालकमंत्री यांना सांगितली व या टोल नाक्यामुळे वेण्णालेक येथे मोठा संघर्ष निर्माण होण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आणुन दिले.