पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:49 AM2017-12-18T11:49:37+5:302017-12-18T11:56:11+5:30
वाई : लहान मुलांमध्ये पतंग खेळण्याची मोठी हौस असते. यामुळे काही काळ मुलांचा खेळ होतोही पण हाच खेळ कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या जीवावर बेततो. असंख्य पक्षी मांज्यामध्ये अडकल्याने मृत्यूमुखी पडतात. त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. वाई तालुक्यातील बावधन येथे असेच पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या दोन घुबडांना पक्षीमित्रांनी सोडवून जीवदान दिले.
प्राणी, पक्षांचे नैसर्गिक आवास धोक्यात येत आहे. अन्न-पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगलातील पक्षी, प्राणी अन्नाच्या शोधात लोकवस्तीच्याजवळ येतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून विष प्रयोग होत असल्याने दुर्मिळ पशु-पक्षांचा नाहक बळी जात आहे.
बावधन येथे काही मुलं पतंग खेळत होते. अन् काही वेळेत दोन घुबडे पतंगाच्या दोऱ्यात अडकले. ही घटना दरेवाडी येथील सह्याद्री प्रोटेक्टर्सचे प्राणीमित्र सुरज अनिल यादव व शाहीर शरद यादव यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यास पतंगाच्या मांज्यामधून सोडवून पुढील उपचारासाठी वाई वनविभागाच्या ताब्यात आणून दिले.
किसन वीर चौकानजीक रविवार पेठेतील सह्याद्री प्रोटेक्टर्सचे प्राणीमित्र अक्षय ढगे, विक्रम ढगे, शंकर ढगे यांना गव्हाणी घुबड जातीचे घाबरलेल्या स्थितीतील वन्यपक्षी मिळून आल्यावर त्यासही त्यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.
दोन्ही घुबडांवर सह्याद्र्री प्रोटेक्टर्सचे वन्यजीवप्रेमी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार केले. ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तंदुरुस्त असल्याबाबत सांगितल्यावर वाई वनविभागाचे वनपाल एस. एस. राजापुरे, वनरक्षक वैभव शिंदे व सुरेश सूर्यवंशी यांनी दोन्ही पक्षांस त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.